पुण्यात कोरोनाग्रस्तांची वाढ; रुग्ण संख्या २ हजार पार

पुण्यात आतापर्यंत 553 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

Updated: May 5, 2020, 06:04 PM IST
पुण्यात कोरोनाग्रस्तांची वाढ; रुग्ण संख्या २ हजार पार title=
संग्रहित फोटो

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. पुण्यात 11 वर्षीय मुलासह तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 119 इतकी झाली आहे. मंगळवारी पुणे जिल्ह्यात 99 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत एकूण 2202 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

पुण्यात आतापर्यंत 553 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

पुणे विभागातील पुणे 102, पुणे मनपात 1796 तर पिंपरी-चिंचवड मनपामध्ये 120 कोरोना रुग्ण आढळले आहेत. सोलापूरमध्ये 135 पॉझिटिव्ह रुग्ण असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सांगलीत 34 जणांना लागण झाली असून एक जण दगावला आहे. 

दरम्यान, हिंगोलीमध्ये एसआरपीएफचे आणखी 14  जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. हे जवान मुंबई आणि मालेगावमध्ये बंदोबस्तासाठी होते. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह जवानांची एकूण संख्या 83 इतकी झाली आहे. तर हिंगोलीमध्ये एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 90वर पोहचली आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढते आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 9310वर गेली आहे. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील धारावीसारख्या झोपडपट्टी भागातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दाटीवाटीने असलेल्या झोपटपट्टी भागात कोरोनाचा फैलाव होणं, ही मुंबईसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

राज्यात एकूण 14 हजार 541 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर 2465 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 583 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.