रत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

साखरतर येथे सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.  

Updated: Apr 14, 2020, 12:58 PM IST
रत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण  title=
संग्रहित छाया

रत्नागिरी : साखरतर येथे सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत कोरोनाची संख्या सहावर पोहोचली आहे. साखरतर येथील कोरोनाबाधित महिलेच्या घरातील बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी साखरतर येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आता याच महिलेच्या घरात एक नातलग महिला आणि एका सहा महिन्यांच्या बाळाला कोरोना झाला आहे. रत्नागिरीतील १०३ पैकी ७८ रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.  अजून २५ रिपोर्ट येणे बाकी आहे. यापूर्वी रत्नागिरीतून एका कोरोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आले असून खेड येथील एकाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, खेड येथील अलसुरे येथील कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तीच्या गावातील १० जणांना स्लबचे नमुने  तपासणी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले,मात्र अद्याप तपासणी करण्यात आली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  त्यामध्ये एक महिला असून एक वर्षाचा छोटा मुलगा आहे मात्र अद्याप त्याची तपासणी करण्यात आली नाही. शनिवार, रविवार तपासणी करता येत नसल्याचे कारण कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातून सांगण्यात येत आहे. 

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातला हापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. पण, त्याला आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण, १ एप्रिल ते १०  एप्रिल या कालावधीत तब्बल पाच हजार हापूसच्या पेट्या या रत्नागिरी जिल्ह्यातून राज्याच्या अनेक ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये रवाना झाला आहे. थेट शेतकरी ते ग्राहक अशी ही साखळी योजना तयार करण्यात आली आहे. प्रति डझन जवळपास ३५० रुपये असा दर सध्या हापूसला मिळत आहे.