कोरोना : पुण्यात टेस्टींग इन्चार्ज म्हणून IPS अधिकारी नेमणूक करा, अजित पवार यांचे निर्देश

 कोरोनाचा फैलाव वाढत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. 

Updated: Jul 4, 2020, 07:46 AM IST
कोरोना : पुण्यात टेस्टींग इन्चार्ज म्हणून IPS अधिकारी नेमणूक करा, अजित पवार यांचे निर्देश title=

पुणे : कोरोनाचा फैलाव वाढत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध राबवा त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोनाविषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी ते  बोलत होते. बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आदी अधिकारी उपस्थित होते.

कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, काही रुग्णालयांमध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करा, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार होताना दिसून येत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कोरोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यासाठी योजना तयार करा. शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.