सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्यात वादाची ठिणगी! महाविकास आघाडीत महाबिघाडी

ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा हडपसर मतदारसंघावर दावा केला आहे. अंधारेंच्या दाव्याला सुप्रिया सुळेंनी विरोध केला आहे. हडपसरवरुन मविआच्या महिला नेत्यांत सुप्त संघर्ष पहायला मिळत आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 8, 2024, 10:14 PM IST
 सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्यात वादाची ठिणगी! महाविकास आघाडीत महाबिघाडी title=

Sushma Andhare Vs Supriya Sule : महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा सुरू आहे.. मात्र, अनेक मतदारसंघात मविआतील घटक पक्षांनी दावे प्रतिदावे करायला सुरूवात झालीय.. त्यामुळे मविआत बिघाडीची शक्यता आहे.. त्यातच पुण्यातील हडपसर मतदारसंघात सुषमा अंधारेंनी उमेदवाराचं नाव घोषित केलंय.. त्यावर सुप्रिया सुळेंनी अंधारेंवर निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे.... मविआच्या प्रभावी महिला नेत्या.... पण या दोघींमध्ये आता संघर्षाची ठिगणी पडलीये. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय. शिवसेना ठाकरे गट हडपसरची जागा लढणार असल्याचं सुषमा अंधारेंनी जाहीर केलंय. काहीही झालं तरी हडपसरवरील दावा सोडणार नसल्याचा निर्धार सुषमा अंधारेंनी केलाय.

हडपसर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. प्रशांत जगतापांनी निवडणुकीची तयारीही सुरु केलीय. असं असताना सुषमा अंधारेंनी हडपसरवर दावा केल्यानं सुप्रिया सुळेंचा पारा चढलाय. जागावाटपाच्या बैठकीला सुषमा अंधारे नसतात, मग त्यांनी हडपसरवर कोणत्या अधिकारानं दावा केला असा सवाल सुप्रियांनी उपस्थित केलाय.

सुषमा अंधारेंना आतापर्यंत महायुतीच्या नेत्यांमधूनच विरोध होत होता. पण आता महाविकास आघाडीतही सुषमा अंधारे विरुद्ध सुप्रिया असा सामना रंगण्याची शक्यता आहे. हडपसरच्या या दावेदारीवरुन दोन्ही दिग्गज महिला नेत्यांमध्ये विसंवाद निर्माण झालाय. या वादाला मोठ्या संघर्षाचं स्वरुप येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत सलग बैठका सुरू आहेत. अनेक जागांवर तिढा कायम असल्यानं बैठकीत तोडगा निघत नसल्याची सुत्रांनी माहिती दिलीये.. आजच्या बैठकीत अनेक जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिलीये.. उद्या विदर्भ आणि खान्देश विभागातील जागांवर अंतिम चर्चा करण्यात येणार असल्याचंही देशमुखांनी सांगितलंय..