नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक आज पार पडली. यावेळी काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांची अध्यक्षपदी तर मनोहर कुंभारे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. काँग्रेसची जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपला काँग्रेसने मोठा झटका देत आपली एकहाती सत्ता आणली. नागपूर जिल्हा परिषदेत ५८ सदस्य असून जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे ३० उमेदवार निवडणून आले आहेत. या ठिकाणी काँग्रेस- राष्ट्रवादीने आघाडी करून निवडणूक लढवली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला दोन विषय समित्यांचे सभापतीपद मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेवर मंत्री सुनील केदार गटाचे वर्चस्व दिसून येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्ष पद न मिळाल्याने नाराजी होती. अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपाध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर माघार घेण्यात आली. राष्ट्रवादीची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीला दोन समित्यांचे सभापतीपद काँग्रेसकडून देण्यात येणार आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होमटाऊन असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल भाजपला धक्का देणारा लागला होता. नागपूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. २०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ पैकी ११ जागा भाजपच्या ताब्यात होत्या. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हादरा बसून जिल्ह्यातील ( ग्रामीणमध्ये ) सहापैकी २ जागाच भाजपला मिळाल्या. तेव्हाच जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला धोका असल्याचं संकेत मिळालं होते. विधानसभा निवडणुकीतील या सत्ताबदलाचे परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेच. युती सरकारमधील ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यावर चांगली पकड होती. परंतु, जिल्हा परिषद निवडणुकीत बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली त्याचा फटका भाजपला विधानसभा निवडणुकीत बसला होताच.बावनकुळेंसारखा मोठा नेता मागे पडल्यामुळे ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्ते काहीसे गोंधळले. त्यामुळे जिल्हा परिषद निवणुकीतही भाजपची मोठी घसरण झाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि बावनकुळे मूळ गावातही भाजपला पराभवाला सामोरं जावे लागले आहे. काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार आणि गृहमंत्री अनिल देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत हिरो ठरले. एकीकडे जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेला मोठा फटका बसला असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नागपूर झेडपीत विजयी झेप घेतली आणि जिल्हा परिषद निवणुकीत निर्विवाद यश मिळवले होते.