अमर काणे, झी मीडिया, नागपूर: गांधी कुटुंबीयांच्या नेतृत्त्वक्षमतविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या स्वपक्षीयांवर काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी पुन्हा एकदा आगपाखड केली आहे. मी यापूर्वी व्यक्त केलेल्या मतावर अजूनही कायम आहे. काही विद्वान नेत्यांनी पत्रातून आपले व्यक्त केले. ज्या सो कॉल्ड बुद्धिमान नेत्यांनी ही भूमिका घेतली आहे, त्यांनी माफी मागावी. अन्यथा त्यांना राज्यात फिरून देणार नाही. मी केवळ बोलत नाही तर कृतीही करून दाखवतो, असा इशाराच सुनील केदार यांनी दिला.
'गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष काँग्रेसची गेलेली पत पुन्हा मिळवून देऊ शकत नाही'
गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात काँग्रेसला लागलेल्या उतरत्या कळेच्या पार्श्वभूमीवर पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर काँग्रेसमध्ये दोन तट पडले होते. अनेक नेत्यांनी गांधी कुटुंबातील व्यक्तीच काँग्रेसचे नेतृत्त्व करण्यासाठी योग्य असल्याची भूमिका घेतली आहे.
काँग्रेस पक्ष तुमच्या आणि राहुलजींच्या हातातच सुरक्षित; राजीव सातवांचे सोनियांना पत्र
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते राजीव सातव यांनीही सोनिया गांधी यांना पत्र लिहून या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. या पत्रात सातव यांनी सोनियांना उद्देशून म्हटले आहे की, तुम्ही कठीण परिस्थितीचा सामना करत आहात, हे आम्हाला माहिती आहे. तरीही तुम्हीच पक्षाचे नेतृत्त्व करावे, ही आमची नम्र विनंती आहे. काँग्रेस पक्ष हा केवळ तुमच्या किंवा राहुलजींच्या हातात सुरक्षित आहे. आता किंवा भविष्यात तुमच्याशिवाय इतर कोणीही काँग्रेस पक्षाला न्याय मिळवू देऊ शकत नाही, असे राजीव सातव यांनी म्हटले आहे.