सोनिया किंवा राहुल गांधींनीच अध्यक्ष असावं, महाराष्ट्र काँग्रेसचा ठराव

सोमवारी होणाऱ्या काँग्रेस बैठकीच्याआधी घडामोडींना वेग आला आहे.

Updated: Aug 23, 2020, 11:13 PM IST
सोनिया किंवा राहुल गांधींनीच अध्यक्ष असावं, महाराष्ट्र काँग्रेसचा ठराव title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सोमवारी होणाऱ्या काँग्रेस बैठकीच्याआधी घडामोडींना वेग आला आहे. सोनिया गांधींनी अध्यक्षपदावर कायम राहावं. जर सोनिया गांधींनी नकार दिला, तर राहुल गांधींनी तात्काळ अध्यक्षपद स्वीकारावं, असा ठराव महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे नेते या बैठकीला उपस्थित होते. 

दुसरीकडे राहुल गांधींनी पुन्हा एकदा काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लिहिलं आहे. कम बॅक राहुलजी, फक्त काँग्रेसलाच नाही तर संपूर्ण देशाला तुमची गरज असल्याचं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनीही राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं, अशी मागणी करणारं निवेदन दिलं आहे. 

सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अध्यक्ष म्हणून आता मला कायम राहायचं नाही, त्यामुळे नवा अध्यक्ष शोधा, असं सोनिया गांधींनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी मात्र या बातम्या फेटाळून लावल्या आङेत. 

काँग्रेस पक्षात दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत बदल करण्यात यावेत, अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिल्याची माहिती समोर आली. यानंतर आता काँग्रेसमधल्या घडामोडींना वेग आला आहे. गांधी कुटुंबाला अशाप्रकारे आव्हान देणे अशाप्रकारे चुकीचं असल्याचं संजय निरुपम आणि कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. असे मुद्दे उपस्थित करण्याची ही योग्य वेळ नसल्याची प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी दिली आहे.