मुंबई : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. पुढच्या काही दिवसात विरोधकांवर अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक होईल असे भाजपाच्या गोटातून जाहीरीत्या सांगण्यात आले. दरम्यान कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट होत आहे. आमदार कालिदास कोळंबकरांच्या भुमिकेकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यांचे नारायण राणेंशीही जवळचे संबध असल्याने राणेंनी काँग्रेस सोडल्यावर कोळंबकर देखील सोबत जाणार का ? असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यानच्या काळात त्यांनी संयम पाळला. माझ्या मतदार संघाचे प्रश्न जो सोडवेल माझा त्याला पाठींबा असेल असे त्यांनी वेळोवेळी सांगितले. आता मुख्यमंत्र्यांनी आपले प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती कोळंबकरांनी 'झी 24 तास' ला दिली.
नायगावमध्ये 42 बिल्डींग तर शिवडीमध्ये 14 बिल्डींग आहेत. मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानल्यानंतर कोळंबकरांचे फोटो काढा असे कॉंग्रेसने आदेश दिले. माझे फोटो लागत नसतील तर मी त्यांचे फोटो का लावू ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गेल्या काही दिवसांपासून कालिदास कोळंबकरांच्या बॅनरवरून कॉंग्रेसचे चिन्ह गायब झाल्याचे दिसत होते. त्यानंतर हल्लीच त्यांच्या जनसंपर्क कार्यालया बाहेरील फलकावर मुख्यमंत्र्यांचा फोटो दिसला. यातून कोळंबकरांनी आपल्या भाजपा प्रवेशाची चाहुल दिली. कोळंबकरांसाठी सध्या वडाळा नायगाव परीसरातील पोलीस वसाहतीच्या पुनरवसनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मुख्यमंञ्यांनी माझी सर्व कामे केली तसेच आमच्या मागण्या पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षात एकही काम झाले नाही, प्रश्न सुटले नाहीत म्हणून मी नाराज असल्याचे कोळंबकरांनी यावेळी सांगितले. माझ्या अडलेल्या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाल्यावर माझा प्रवेश असेल असे सूचक विधान त्यांनी 'झी 24' शी बोलताना केले. मुंबई पोलिसांच्या गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भातील प्रश्न सुटल्यावर मी जाहीर प्रवेश करणार असल्याचे विधान आमदार कोळंबकर यांनी केले आहे. त्यामुऴे विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर हा प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.