अकोला : प्रकाश आंबेडकरांनी आज अखेर काँग्रेससोबतची संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा केली आहे. अकोल्यातील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेसबरोबरचे चर्चेचे सर्व प्रस्ताव संपलेत. यानंतर काँग्रेससोबतच्या चर्चा पुढे जाणे शक्य नाही असे आंबेडकर म्हणाले आहेत. येत्या १५ तारखेला मुंबईत लोकसभेचे संपूर्ण ४८ उमेदवार जाहीर करणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले आहेत.
वंचित बहूजन आघाडीनं जाहीर केलेले २२ उमेदवार मागे घेऊ शकत नाही, असे आंबेडरांनी स्पष्ट केले. या सर्व उमेदवारांना काँग्रेसने आपल्या चिन्हावर लढवण्याचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळल्याचा आंबेडकरांनी सांगितले. त्यामुळेच आता आघाडीशी चर्चा थांबवत असल्याचे ते म्हणाले. मात्र, चर्चेचे सारेच दोर कापलेले नसल्याचे सांगत १५ तारखेपर्यंत काँग्रेस बोलणी करू शकणार असल्याचे संकेत आंबेडकरांनी दिले. दरम्यान, आपल्या कुटुंबातून इतर कुणीही निवडणूक लढवणार नसल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन विकास आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे २२ जागांची मागणी केली होती. त्यामध्ये बारामती, नांदेड आणि माढा या तीन जागांचाही समावेश आहे.
भारिप-बहूजन महासंघ आणि वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातून लोकसभा लढविणार असल्याचं म्हटलंय. त्यामूळे सोलापुरात सुशीलकुमार शिंदे विरूद्ध प्रकाश आंबेडकर अशी हाय होल्टेज लढत रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबेडकर अकोल्यातून लढणार की नाही? या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. आंबेडकर दोन मतदार संघातून लढणार का? असाही प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. सोलापुरातून आंबेडकरांची उमेदवारी आधीच वंचित बहूजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी जाहीर केली होती. आज आंबेडकरांनी त्याला दुजोरा दिला. दरम्यान, आजपर्यंत तरी सोलापुरातून लढण्यावर ठाम आहे. उद्याचं सांगता येणार नाही? असं सांगत आंबेडकरांनी यावर काहीशी संदिग्धताही कायम ठेवली आहे.