वडेट्टीवार नाराज, कोणाला कोणते खाते द्यायचा हा श्रेष्ठींचा निर्णय - थोरात

 ठाकरे सकारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे अजूनही नाराज आहेत. त्यांनी आज मंत्रिंमंडळ बैठकीला चक्क दांडी मारली.  

Updated: Jan 7, 2020, 07:55 PM IST
वडेट्टीवार नाराज, कोणाला कोणते खाते द्यायचा हा श्रेष्ठींचा निर्णय - थोरात title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र विकासआघाडीच्या सकारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे अजूनही नाराज आहेत. त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला चक्क दांडी मारली. यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सावध भूमिका मांडली आहे. खाते वाटप करताना पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घेतला आहे. त्यामुळेकोणाला कोणतं खातं द्यायचं याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे सांगत थोरात यांनी याबाबत हात झटकलेत.

ठाकरे सरकारचे खातेवाटप झाले. त्यानंतर मंत्रिंडळात स्थान न मिळाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार नाराज झाले होते. त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या नाराज आमदारांची नाराजी दूर केली. परंतु काँग्रेसमध्ये अद्याप नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. खाते वाटपानंतर ठाकरे सरकार पूर्ण ताकदीने कामाला लागलेले नाही. मनाजोगं खातं मिळालं नाही म्हणून कुरबुरी सुरूच असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या रुपानं या नाराजीला मोकळी वाट मिळण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राहिलेल्या वडेट्टीवारांना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण खातं मिळाले आहे. 

वडेट्टीवार नाराज, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारणार

याखेरीज खार जमीन विकास, भूकंप पुनर्वसन ही खातीदेखील वडेट्टीवारांकडे असली तरी यातलं एकही खातं महत्त्वाचं नाही. त्यामुळे ते नाराज झालेत. त्यांनी अद्याप आपल्या खात्यांचा कारभारही हाती घेतलेला नाही. तशातच मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीलाही त्यांनी दांडी मारली. मुंबईबाहेर असल्यामुळे बैठकीला आले नसल्याचं सांगितलं गेलं असलं तरी यामुळे नाराजीच्या चर्चेला बळकटी मिळालीये. दुसरीकडे कोणाला कोणतं खातं द्यायचं याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे थोरात यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपने या नाराजीवरुन सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले. तर आज चक्क माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विजय वडेट्टीवार यांना जाहीर भाजपमध्ये येणाचे आमंत्रणच दिले आहे. वडेट्टीवार नाराज असतील तर ते त्यांचं भाजपमध्ये स्वागतच असेल, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगून टाकले. भाजपला जागा कमी पडल्यानं आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खेळीमुळे खरंतर काँग्रेसला सत्तेची लॉटरी लागली. मात्र एकदा सत्ता आली म्हटल्यावर सर्वांनाच चांगली खाती हवी आहेत. काँग्रेस नेतृत्वाने ही नाराजी वेळीच शमवणे आवश्यक आहे. अन्यथा बंडखोरांवर भाजपचा डोळा आहेच. त्याचाच एकभाग म्हणून बावनकुळेंनी विजय वडेट्टीवार यांना जाहीर निमंत्रणच दिले आहे.