Raut vs Raut: महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) वेध लागले असताना महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यातच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट करा मी पाठिंबा देतो असं म्हटलं होतं. त्यातच आता संजय राऊत यांच्या विधानामुळे काँग्रेस नाराज झाली आहे. संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेसच्या नितीन राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
2019 मध्ये उद्धव ठाकरेंना सर्वसंमतीने मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. आता 2024 मध्ये ती वेळ आली आहे. योग्य प्रकारे जागावाटप होईल आणि राज्याच महाविकास आघाडीचं सरकार येईल. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असा मला विश्वास आहे. जनतेच्या मनात तेच मुख्यमंत्री आहेत असं संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
संजय राऊत यांच्या विधानाने काँग्रेस नाराज झाली आहे. ज्या पक्षाच्या जास्त जागा असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा मी त्यांना पाठिंबा देतो असं म्हटलं होतं.
संजय राऊत यांना काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. 'जिनके घर शिशेके होते है, वह दुसरो के घरोपर पत्थर नहीं फेका करते', असा टोला त्यांनी लगावला आहे. पवार गट, ठाकरे गट जागांवर दावा करत असतील तर पक्ष म्हणून आम्हालाही जागांवर दावा करण्याचा अधिकार आहे. कोण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल, हे संजय राऊत ठरवणार नाहीत किंवा मीदेखील नाही असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री पदाबाबत माध्यमात चर्चा करुन होत नाही, संजय राऊत यांनी आमच्या हायकमांडशी बोलावं असंही ते म्हणाले. शिवसेनेच्या सर्वेबाबत आम्हाला कल्पना आहे. मुंबईत ते सर्वे करत आहे. ते मराठवाड्यातही सर्वे करत आहेत. महाविकास आघाडीने एक संयुक्त सर्वे करावा आणि ज्याच्या जास्त जागा सर्वेत दाखवेल त्यांनी त्या लढाव्या. विदर्भातील 62 जागा आमच्या बाजूनं हा आमचा सर्वे सांगतो असंही त्यांनी सांगितलं.