गुलाबी साडीवाल्या ताईंच्या गुलाबी रिक्षात बसून अजित पवार निघाले कुठे? फोटो सोशल मिडियावर व्हायरल

अजित पवारा यांचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत अजित पवार गुलाबी रिक्षातून प्रवास करताना दिसत आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Aug 18, 2024, 05:54 PM IST
गुलाबी साडीवाल्या ताईंच्या गुलाबी रिक्षात बसून अजित पवार निघाले कुठे? फोटो सोशल मिडियावर व्हायरल title=

Ajit Pawar : अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये अजितदादा गुलाबी जॅकेटमध्येच पाहायला मिळत असल्याने अजितदादांच्या नव्या लूकची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच अजित पवार यांचा एक फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  या फोटोमध्ये अजित पवार एका गुलाबी साडीवाल्या ताईंच्या गुलाबी रिक्षात बसलेले दिसत आहेत.  

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कात टाकली असून पक्षाचे प्रतिमावर्धन करण्याची जोरदार तयारी चालवली आहे.त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीची प्रचार आणि प्रसिद्धीची रणनीती आखण्याचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. त्यामुळे गुलाबी रंग ही पक्षाची खास ओळख ठसवण्यात येणार आहे. कार्यक्रमांमध्ये सर्वत्र गुलाबी रंग प्राधान्याने वापर होत असल्याचे दिसत आहे. 

अजित पवार यांनी सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अजित पवार रिक्षातून प्रवास करत आहेत. या रिक्षाची चालक ही महिला आहे. या महिलेच्या हातात गुलाबी रिक्षाचे स्टेअरिंग आहे. अजित पवार प्रवासी म्हणून रिक्षात बसले आहेत.  अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेतील हा फोटो आहे. Pink is power! असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. त्यांचा हाच फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

गुलाबी जॅकेटवर पांढरा गुलाब

यापूर्वी देखील अजित पवार यांचा पत्नीसोबतचा एक खास फोटो व्हायरल झाला होता. अजित पवारांच्या वाढदिवसादिवशीच त्यांच्या अर्धांगिणीने म्हणजे सुनेत्रा पवारांनी गुलाबी जॅकेटवर पांढरा गुलाब लावतानाचा हा फोटो होता.   गुलाबी जॅकेटवाल्या अजित पवारांनी धुळे दौ-यात अचानक ताफा थांबवला.. आणि दादा थेट शेतात गेले. शेतात काम करणा-या महिलांशी दादांनी आपुलकीने संवादही साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटवरून राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे.. या गुलाबी जॅकेटवरून शरद पवारांनी अजित पवारांना मिश्किल टोला लगावलाय. तर अजित पवारांच्या बदलत्या रंगाचा त्यांना निवडणुकीत फायदा होणार नसल्याचं विधान पवारांनी केलंय..

सरडा आणि ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का असा सवाल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना विचारला. अजित पवारांनी गुलाबी रंगाला आपलंसं केलं. त्यावरून सरडाही रंग बदलतो अशी खोचक टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्याला अजित पवारांनी पुण्याच्या आंबेगावमधील जनसन्मान यात्रेत उत्तर दिलं.