Pune University Admission Process : बातमी विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी. पुणे विद्यापीठाच्या एका परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं नॅक नसलेल्या कॉलेजात प्रथम वर्षासाठी प्रवेशासाठी बंदी घातली आहे. कुलसचिवांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.
आतापर्यंत ज्या कॉलेजेसनी नॅक मूल्यांकन किंवा एन बी ए मानांकनासाठी अर्ज सादर केलेले नाही त्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये फस्टईयरचे प्रवेश विद्यापीठाच्या परवानगीशिवाय करू नये. विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कॉलेज किंवा संस्थेची असेल असं या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजसह टेक्निकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशात संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी, बारावीच्या लेखी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जुलै-ऑगस्टमध्ये ही पुरवणी परीक्षा होईल. राज्य मंडळाकडून नऊ विभागात दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा होणार आहे.
पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान तर बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होईल. बारावीची व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. दहावी, बारावीच्या निकालात मिळालेल्या गुणांवर जे विद्यार्थी समाधानी नसतील त्यांना ही पुरवणी परीक्षा देता येईल. तसेच जे विद्यार्थी नापास झाले आहेत अशांनाही पुन्हा परीक्षेची संधी मिळणार आहे.
दरम्यान, अनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्याप 13 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती जुळत नाही. तर 3 लाख 91 हजार विद्यार्थ्यंकडे आधार कार्डच नाहीत. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत आधार पडताळणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. शाळांसाठी ही अंतिम मुदतवाढ असणार आहे. शिक्षण विभागाकडून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आधार प्रमाणित विद्यार्थी गृहीत धरले जाणार आहेत. या आधार कार्ड पडताळणीनुसारच संचमान्यता केली जाईल अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील 614 अनधिकृत शाळांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. यातील 102 शाळा बंद करण्यात आल्यात तर तीन शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 289 अनधिकृत शाळा एकट्या मुंबईत आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यात 174, पालघरमध्ये 142 तर रायगडमध्ये 8 शाळा आहेत. यातील 102 शाळा बंद करण्यात आल्यात तर 486 शाळांवर कारवाई सुरु आहे. तर कारवाई सुरु झाल्यापासून, 26 शाळांना राज्य सरकारकडून आवश्यक मान्यता मिळवण्यात यश आले आहे.