सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात येईपर्यंत आपल्या मृतदेहाला अग्नी देऊ नका अशी चिठ्ठी लिहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट गावातील शेतकऱ्यांनं आत्महत्या केलीय. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांना फोनवरून कुटुंबियांचं सात्वन केलं. कुटुंबियांना एक लाखांची मदत आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात पेटलेले शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले.
मुख्यमंत्र्यांशी बोलून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी धनाजी जाधव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं. धनाजी जाधव यांनी बुधवारी रात्री 8 च्या सुमारास आत्महत्या केली. जाधव यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू जमीन असून त्यांच्यावर स्टेट बँक आणि सोसायटीच लाखो रुपये कर्ज आहे.
घरातील थोरला व्यक्ती असल्याने सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र शेतीतील सततच्या नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली. कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटले असताना वीटमध्ये धनाजी चंद्रकांत जाधव यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.