राजेश सोनोने, अमरावती : चार नवजात बालकं मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल रुग्णालय प्रशासन दाबत असल्याचा आरोप, मृत बालकांच्या पालकांनी केला आहे. या मृत्यू प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी पीडित पालकांनी केलीय.
अमरावतीतल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात २८ मे रोजी ४ नवजात बाळांचा मृत्यू झाला होता. या घटनेला १० दिवस उलटूनही अजून पर्यंत त्यांचा शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासन, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. म्हणून सीबीआय मार्फत तपास करण्याची मागणी केली जातेय.
दरम्यान या ४ नवजात बालकं मृत्यू प्रकरणी पोलिसांनी घटनेच्या दिवशी सेवेवर असलेले डॉक्टर भूषण कट्टा आणि परीचारीका माया थोरात यांना अटक केली होती. मात्र त्यांना जमीन मिळाला आहे. रुग्णालय प्रशासन आणि संस्थेतले इतर पदाधिकारी हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप पालकांनी केलाय.