मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या पाणी थकबाकीदारांची यादी समोर आली आहे. या यादीत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याचे देखील नाव आहे. वर्षा बंगल्याचीही थकबाकी समोर आल्याने या विषयाची जास्त चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासोबतच अनेक नेत्यांच्या निवासस्थाने या यादीत आहेत. माहिती अधिकार मिळालेल्या माहितीनुसार हे वृत्त समोर आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगला मुंबई महापालिकेनं थकबाकीदारांच्या यादीत टाकला आहे. कारण या बंगल्याचं साडेसात लाखांचं पाणी बिल थकले आहे. फक्त मुख्यमंत्रीच नाही तर इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची ८ लाखांची पाणी बिलं थकली आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती. त्यातून ही माहिती उघड झाली आहे. अद्याप यावर मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया आली नाही. सर्व प्रश्नांना उत्तर देणारे मुख्यमंत्री याप्रश्नी काय प्रतिक्रिया देणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.