Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती आहे.किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. काश्मिरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली. हिमवर्षाव होत असताना सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. काश्मिर खोऱ्यात साजऱ्या झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या X या सोशल मिडिया हँडलवरुन काश्मिरमधील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष... कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी #शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, याबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. असे कॅप्शन मुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिडिओ शेअर करताना दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही मीनिटांत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकजण हा व्हिडिओ रिशेअर करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली.
काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष...
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी #शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी… pic.twitter.com/S6S4Y3bxXI— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 19, 2024
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरही शिवजयंतीचा उत्साह पहायला मिळला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्यासह शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आयुक्त इक्बाल सिंह चहल उपस्थित होते.
पुण्यात शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवमहोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होत. या सोहळ्याला शरद पवारांनी उपस्थिती लावून शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसेच आदर्श माता-पिता पुरस्कार आणि शिवसन्मान पुरस्कारकर्त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं.