छत्रपती संभाजीनगरमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू; दोन सख्ख्या भावांचा समावेश

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले होते.

आकाश नेटके | Updated: Jan 12, 2024, 08:20 AM IST
छत्रपती संभाजीनगरमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू; दोन सख्ख्या भावांचा समावेश title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. वाळूज परिसरात पोहायला गेलेल्या चार चिमुकल्या मुलांचा बुडून मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये दोन सख्खा भावांचा देखील समावेश आहे. त्यामुळे मृत मुलांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले होते.

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगावच्या दत्तनगरातील चार शाळकरी मुलांचा गुरुवारी संध्याकाळी बनकरवाडी तलावात बुडून मृत्यू झाला. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (12), अफरोज जावेद शेख (14), अबरार जावेद शेख (12) व कुणाल अनिल दळवी (12) अशी मृत मुलांची नावे आहेत. दोन भावंडांपैकी अफरोज मदरशात तर अबरार साईराम इंग्रजी शाळेत शिकत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं होतं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढून घाटी दवाखान्यात पाठवले होतं.

सर्व मुले एकाच भागात राहत असल्याने मित्र होती. गुरुवारी दुपारी खेळण्याच्या नादात ते बाहेर पडले. उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशात सुरू केली. बराच वेळानंतर जवळच असलेल्या बनकरवाडी तलावाच्या काठावर या मुलांचे कपडे दिसले. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी अग्निशमन विभागाला कळवले. पथकाने बुडालेल्या मुलांना बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले,मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले

गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी विश्वजितकुमार, अबरार, अफरोज, कुणाल हे घराबाहेर पडले होते. मात्र, संध्याकाळ होऊन गेली तरी चौघेही घरी परतले नाही. त्यामुळे मुलं घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. या चारही मुलांचा रांजणगाव शेणपुंजीच्या संपूर्ण परिसरात शोध घेण्यात आला. त्याचवेळी काही लोक मुलांच शोध घेत काही बनकरवाडी तलावाजवळ पोहचले. यावेळी लोकांना तलावालगत अफरोज, अबरार तसेच इतर दोन मुलांचे कपडे दिसून आले. त्यामुळे मुले तलावात बुडाल्याचा संशय आल्याने नातेवाईकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलाने चौघांचेही मृतदेह तलावाबाहेर काढले.