विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : शाळेत (School) विद्यार्थ्यांचे छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडणं होत असतात. मात्र पालक आणि त्यांचे शिक्षक यामध्ये मध्यस्थी करतात आणि हा वाद कायमचा मिटवून टाकतात. मात्र काहीवेळा या भांडणाचं रुपांतर एखाद्याचा जीव जाण्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. वर्गातील बाकावरुन बसण्याच्या वादातून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) दौलताबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी (Chhatrapati Sambhaji Nagar Police) याप्रकरणी शाळेतल्या अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादमध्ये वर्गातल्या बाकावर बसण्यावरून वाद झाल्यानंतर मधल्या सुट्टीत शाळेच्या मैदानावर चार वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान शुक्रवारी घाटी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात चार अल्पवयीन मुलांवर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक मनोहर गायकवाड असे मृत विद्यार्थीचे नाव आहे.
दौलताबाद येथील देवगिरी विद्यालयातील सातवीच्या वर्गात कार्तिक मनोहर गायकवाड हा शिकत होता. 6 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता शाळेतील वर्गखोलीत बाकावर बसण्यावरून त्याचा एका वर्गमित्राशी वाद झाला. त्यानंतर मधल्या सुट्टीत शाळेच्या मैदानावर कार्तिक खेळताना भांडण झालेला त्याचा वर्गमित्र व इतर वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी त्याला गाठलं. कार्तिक गायकवाड याला एकटं गाठून या चारही विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली. यात त्यानंतर हे चारही जण निघून गेले.
मारहाण झालेल्या दिवसापासूनच कार्तिक पोटात दुखत आहे, असे घरच्यांना सांगत होता. पोटाच्या दुखण्यामुळे कार्तिक शाळेतही जात नव्हता. 11 जुलै रोज कार्तिकला अधिक त्रास होत असल्याने वडील मनोहर गायकवाड हे त्याला खासगी दवाखान्यात उपचराचासाठी घेऊन गेले. मात्र तरीही कार्तिकला आराम मिळाला नाही. अखेर डॉक्टरांनी मोठ्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचे सांगितले. त्यानंतर कार्तिकला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान कार्तिक गायकवाड याचे 14 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. याप्रकरणी कार्तिकचे वडील मनोहर गायकवाड यांनी बुधवारी दौलताबाद पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी चारही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखवला आहे.