विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल (blackmailing) करत अठरा जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजी नगरात (Chhatrapati Sambhaji Nagar) उघड झालाय. या धक्कादायक प्रकारामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी संभाजी नगरमधील सातारा पोलीस ठाण्यात (Sambhaji Nagar Police) एकूण सहा जणांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक तसेच आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
आरोपींनी ब्लॅकमेल करत सतत सहा महिने 18 आरोपींनी अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे. पालकांनीही आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही असाही आरोप मुलीने केला आहे. त्यामुळे मुलीने गेल्या महिन्यात घरातून पळ काढला होता. घरातून अल्पवयीन मुलगी थेट रेल्वे स्थानकावर पोहोचली. मात्र मुलीला एकटे पाहून रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे चौकशी केली. आश्चर्याची बाब म्हणजे रेल्वे पोलिसांनी मुलीला पालकांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी मुलीचा ताबा घेण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी तिला एका संस्थेत दाखल करण्यात आले. तिथं पोलिसांनी विचारपूस केली आणि सगळं सत्य पुढं आलं.
ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2023 या सहा महिन्यांत व्हिडिओवरून ब्लॅकमेल करत आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. सुरुवातीला मित्रानेच अत्याचार केला आणि त्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ बनवले. त्यानंतर मित्राने त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांनाही ते फोटो दिले. त्यातूनच प्रत्येकाने ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचं अल्पवयीन मुलीचं म्हणणं आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित अल्पवयीन मुलगी 2022 मध्ये सुरुवातीला मुख्य आरोपीच्या संपर्कात आली होती. त्यानंतर त्यांचे व्हॉट्सअॅपवर बोलणे सुरु झाले. यानंतर त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान आरोपीने मुलीवर अत्याचार केला आणि त्याचा मोबाईलमध्येही व्हिडीओ शूट केला. त्यानंतर आरोपीने हाच व्हिडीओ दाखवून मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांनाही हा व्हिडीओ शेअर केला. त्यांनीही ब्लॅकमेल करत आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. पालकांना हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही असे मुलीने म्हटलं आहे. त्यामुळे मुलीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलगी थेट रेल्वे स्थानकावर पोहोचली. मात्र रेल्वे स्थानकावरील लोकांना एकट्या मुलीची वागणूक संशयास्पद वाटली. त्यांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानकावर धाव घेत मुलीला ताब्यात घेतले आणि तिच्याकडे चौकशी सुरु केली.