'संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार'; अब्दुल सत्तारांसमोर गंभीर आरोप

Chhatrapati Sambhaijnagar : संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सोसायटीच्या चेअरमनने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर हे आरोप करण्यात आले आहेत.

आकाश नेटके | Updated: Jan 14, 2024, 05:18 PM IST
'संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार'; अब्दुल सत्तारांसमोर गंभीर आरोप title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर :  गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मग ठिकाण कोणतंही असो सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आल्यावर एकमेकांवर आरोप सुरु होतात. मात्र या महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांचाही समावेश आहे. आता संभाजीनगरमध्ये एका व्यक्तीने थेट मंत्र्यांसमोरच पालकमंत्र्यांवर पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये विकास कामांसाठी मंत्री 15 टक्के कमिशन घेतात असा आरोप थेट मंत्र्यांसमोरच एका सोसायटीच्या चेअरमनने केला आहे. जिल्ह्यात सध्या मजूर सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. खुलताबाद येथेही या निवडणुकीच्या प्रचाराची सभा होती. तेव्हा एका सोसायटीच्या चेअरमनने बोलताना पालकमंत्री भुमरे हे 15 टक्के कमिशन घेतात तर आम्ही काम तरी कशी घ्यायची असा सवाल केला. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळई व्यासपीठावर पणनमंत्री अब्दुल सत्तार सुद्धा बसले होते. तसेच आरोप करताच अब्दुल सत्तार सुद्धा हसले.

"10 लाखांचे जे काम आलं होतं ते मोठ्या लोकांनी केले. आमच्याकडे आजपर्यंत एकही काम आलं नाही. आम्ही फक्त नावाला चेअरमन आहोत. आमची परिस्थिती खूप गंभीर आहे. सत्तार साहेब भेटले म्हणून आमची छाती भरून आली. त्यांच्याजवळ बोलणार नाही तर कुणासमोर बोलणार. कामासाठी पालकमंत्री भुमरेंकडे गेले तर ते 15 टक्के मागतात. सत्तार साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्यासारख्या गोरगरिब चेअरमनकडे त्यांनी पाहावं," असं या चेअरनमनने म्हटलं आहे.

पालकमंत्री संदीपन भुमरे यांची 15 टक्के कमिशन घेतात असा आरोप करणारी एका कार्यकर्त्याची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावर बोलताना त्या कार्यकर्त्याने समोर यावं आणि मी टक्केवारी घेतो असे सिद्ध करावे असे आवाहन संदिपान भुमरे यांनी  केले आहे. उगाच मला बदनाम करण्याचा डाव काही लोक करतात. याआधीही अशा क्लिप व्हायरल केल्या आहेत. मात्र मी याला भीक घालत नाही, असं म्हणत  संदीपान भुमरे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.