आशीष अम्बाडे, झी २४ तास, चंद्रपूर : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यानं चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या भाताची दयनीय अवस्था झाली आहे. कापसाचं पीकही मोठ्या प्रमाणात प्रभावीत झालंय. त्यामुळं नव्यानं भाताचे पऱ्हे टाकावे लागतात की काय ? अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्यासारखं ऊन तापायला लागल्यानं शेतजमिनीला चक्क भेगा पडल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य पीक म्हणजे भात. सुमारे पावणेदोन लाख हेक्टर एवढं याचं क्षेत्र आहे. भाताच्या पीकासाठी मुबलक पाणी लागतं. जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी नसल्यानं शेतकऱ्यांना पावसाशिवाय गत्यंतर नाही. जूनच्या शेवटी आलेल्या थोड्याफार पावसानं पल्लवीत होऊन भात उत्पादकांनी भाताचे पऱ्हे टाकले. जुलैच्या प्रारंभी थोडाफार पाऊस आल्यानं पऱ्हे वाढू लागले. पण आता गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानं डोळे वटारल्यानं पिकाची अवस्था मृतःप्राय झाली आहे. वर आलेलं पीक तीव्र उन्हामुळं करपू लागलंय.
हजारो हेक्टरवर ही परिस्थिती बघायला मिळत आहे. भातासोबतच कापसाचीही अवस्था बिकट झाली आहे. जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचं हे पीकही पावसाअभावी धोक्यात आलंय. पऱ्हाटीची पान चक्क सुकायला लागली आहेत. उन्हामुळं शेतीला भेगा पडू लागल्यात. त्यामुळं भात आणि कापूस उत्पादक डोळ्यात प्राण ओतून पावसाची वाट बघत आहेत.
मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी २६८ मिमी पाऊस पडला. टक्केवारीत बोलायचं झाल्यास केवळ २२ टक्के पाऊस झालेला आहे. या जिल्ह्याची सरासरी ११०० मिमी एवढी आहे. पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला. मात्र, निम्मी सरासरीही अजून जिल्ह्यानं गाठलेली नाही. येत्या आठवड्यात दमदार पाऊस आला नाही तर जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.