नाकापेक्षा मोती जड! मध्य रेल्वेचा एस्केलेटर देखभालवरील कोट्यावधीचा खर्च

एका एस्केलेटरच्या देखभालीवर पश्चिम रेल्वे 1.85 लाख वर्षाला खर्च करते तर मध्य रेल्वे 2.97 लाख रुपये खर्च करत असल्याची माहिती ही माहिती अधिकारात उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मागितली होती. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Mar 20, 2024, 05:20 PM IST
नाकापेक्षा मोती जड! मध्य रेल्वेचा एस्केलेटर देखभालवरील कोट्यावधीचा खर्च title=

Central Railway : लोकल ही मुंबई करांची लाईफलाईन आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतता. रेल्वे प्रवाशांच्या सोईसाठी  मुंबईतील जवळपास सर्व रेल्वे स्थानकांवर एस्केलेटर बसविण्यात आले आहेत. अनेकदा  एस्केलेटर बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होवून त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. असे असले तरी  एस्केलेटर हे रेल्वे प्रशासनासाठी नाकापेक्षा मोती जड अशी वस्तू झाली आहे. याला कारण आहे ते  एस्केलेटरच्या देखभालवर होणारा खर्च. एस्केलेटर देखभालवरील मध्य रेल्वे कोट्यावधी रुपये खर्च करत असल्याची धक्कादायाक माहिती समोर आली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे एस्केलेटरच्या बाबत विविध माहिती विचारली होती. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता शकील अहमद यांनी अनिल गलगली यांस कळविले की चर्चगेट ते विरार या दरम्यान 106 एस्केलेटर आहेत. एका एस्केलेटरचा प्रतिवर्षं देखभाल खर्च हा 1.85 लाख आहे. तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता एच एस सूद यांनी अनिल गलगली यांस कळविले की सीएसटीएम ते कल्याण आणि सीएसटीएम ते वाशी या दरम्यान 101 एस्केलेटर आहेत. एका एस्केलेटरचा प्रतिवर्षं देखभाल खर्च हा 2.97 लाख आहे. 

1825 वेळा बंद पडते एस्केलेटर

पश्चिम रेल्वेने बंद होणाऱ्या एस्केलेटरची माहिती देताना स्पष्ट केले आहे की एका वर्षात 1825 वेळा एस्केलेटर बंद पडते. 95 टक्के आपत्कालीन बटन अज्ञात व्यक्तीकडून बंद केल्याने एस्केलेटर बंद होते. तर मध्य रेल्वेच्या एच एस सूद यांनी बंद एस्केलेटरची माहिती जतन न केल्याची कबूली दिली आहे. विशेष दिवशी बंद असलेल्या एस्केलेटर माहिती विचारली तर ती दिली जाऊ शकते.

अनिल गलगली यांनी मुंबईतील 2 रेल्वे अंतर्गत एस्केलेटर बाबत खर्चातील 1.12  लाखांच्या तफावतीवर आश्चर्य व्यक्त केले.यामुळे मध्य रेल्वेला वर्षाला 1.13 कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे चौकशीची मागणी करत संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुविधासाठी बसविण्यात आलेले एस्केलेटर गर्दीच्या अधिकांश वेळी बंद असल्याने प्रवाश्यांना दुविधांचा सामना करावा लागतो, याबाबत नाराजगी व्यक्त केली आहे.