'भाजपाच्या चिन्हावरच...', नवनीत राणांचा उल्लेख होताच फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं, 'त्यांनी 5 वर्षं...'

Devendra Fadnavis on Amravati: अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढताना नवनीत राणा स्वाभिमान पार्टीकडून रिंगणात उतरणार की, भाजपच्या चिन्हावर लढणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 20, 2024, 05:28 PM IST
'भाजपाच्या चिन्हावरच...', नवनीत राणांचा उल्लेख होताच फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं, 'त्यांनी 5 वर्षं...' title=

Devendra Fadnavis on Amravati: आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती अमरावती मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार याबाबत चर्चा रंगली आहे. नवनीत राणा या मतदारसंघातून खासदार असून त्या स्वाभिमान पार्टीकडून रिंगणात उतरणार की, भाजपच्या चिन्हावर लढणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अमरावती मतदारसंघ नवनीत राणा यांच्यासाठी सोडण्यात येणार आहे. केंद्रीय संसदीय समितीकडूनही यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे. 

"अमरावतीची जागा भाजपा लढेल. जो उमेदवार असेल तो भाजपाच्या चिन्हावरच लढेल. नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत. पाच वर्ष त्या भाजपासह राहिल्या आहेत. लोकसभेत त्यांनी ताकदीने भाजपा आणि पंतप्रधान मोदींची बाजू मांडली आहे. अखेर अंतिम निर्णय संसदीय समिती किंवा निवडणूक समिती घेते. त्यावर अधिक भाष्य करु शकत नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

पुढे त्यांनी सांगितलं की, "भाजपाच्या वतीने ज्या उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली आहे, तेथील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मी आणि चंद्रशेखर बावनकुळे दौरा करत आहोत. आज आम्ही अकोल्यात असून, उद्या वर्ध्याला जाणार आहोत. आम्ही सगळ्या मतदारसंघात जाणार आहोत. जाहीर प्रचाराच्या आधी सर्व प्लॅनिंग करत आहोत. तसंच काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न आहे". 

अकोला आणि वाशीमच्या टीमने अतिशय चांगली तयारी केली आहे. बूथपर्यंत सगळी रचना लावली आहे असं कौतुक त्यांनी केलं. तसंच पक्षाने ही निवडणूक बूथमध्ये लढली पाहिजे असा प्रयत्न असून, तशी तयारी सुरु आहे. येथे चांगला निर्णय येईल असा विश्वास आहे असंही ते म्हणाले. 

"हर्षवर्धन पाटलांची नाराजी नव्हती, काही प्रश्न होते. ते प्रश्न सोडवण्याचं आश्वासन मी दिलं आहे. त्यातील काही अडचणी सोडवल्या आहेत. हर्षवर्धन पाटील पक्षात आल्यापासून भाजपाला मोठं करण्याचा प्रयत्न केला आहे. समर्पित भावनेने त्यांनी काम केलं आहे. हे नेतृत्व मोठं झालं पाहिजे ही पक्षाची जबाबदारी आहे. ते पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवारासाठी काम करतील," असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. 

मोहिते-पाटलांनी प्रचार सुरु ठेवला असल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "एकदा निर्णय झाल्यानंतर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीने जो उमेदवार निवडला त्याच्यासोबत काम केलं पाहिजे. काही नाराजी असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करत एकत्र ठेवत आहोत". 

दरम्यान संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्याबद्दल विचारलं असता त्यांनी उपहासात्मकपणे उत्तर दिलं. संजय राऊत कोण आहेत? संजय राऊतांसारख्या माणसाबद्दल तुम्ही मला प्रतिक्रिया विचारत आहात. माझी काही तरी प्रतिमा ठेवा असं ते म्हणाले.