BJP चे गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं CCTV आलं समोर; पाहा पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Kalyan Crime CCTV: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने सध्या राजकारण तापलं  आहे. त्यातच आता गोळीबाराचं सीसीटीव्ही समोर आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 3, 2024, 02:53 PM IST
BJP चे गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं CCTV आलं समोर; पाहा पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं? title=

Kalyan Crime CCTV: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाचेच दोन नेते आपापसात भिडल्याने राजकारणही तापलं  आहे. गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान या गोळीबाराचं सीसीटीव्ही आता समोर आलं आहे. या सीसीटीव्हीत पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं हे दिसत आहे. सीसीटीव्हीत दिसत आहेत त्यानुसार कोणालाही गोळीबार होईल याची कल्पनाही नव्हती. पण गोळीबार झाल्यानंतर पोलीस ठाण्यात नेमकं काय चित्र होतं हे तुम्ही त्यात पाहू शकता. 

गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर गणपत गायकवाड यांनी आपण गोळीबार केल्याची कबुली दिली. इतकंच नाही तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे. 

गोळीबारानंतर आमदार गायकवाड यांनी 'झी 24 तास'कडे प्रतिक्रिया नोंदवली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या सामान्य माणसाला आरोपी बनवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल जगताप यांच्यासमोरच हा सगळा गोळीबार झाला. महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत. जमिनीच्या वादातून हा सगळा हल्ला झाला आहे. 

गोळीबार नेमका का केला?

"पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्तीने कब्जा घेतला. मला मनस्ताप झाला आणि म्हणून मी गोळीबार केला," असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना गणपत गायकवाड यांनी, "एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार बनवलं आहे," असा आरोप केला. 

तुम्ही पोलिसांसमोर 5 गोळ्या झाडल्या असल्याच्या आरोपाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "हो मी स्वत: गोळ्या झाडल्या. मला काही पश्चाताप नाही. माझ्या मुलांना पोलिसांसमोर जर मारत असतील तर मी काय करणार?" पोलिसांनी पकडलं मला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण माझ्याबरोबर असं कोणी करत असेल पोलिसांसमोर तर मला आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रभर असेच गुन्हेगार पाळून ठेवलेले आहेत".