नांदेड : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या हत्या झालीये. मोटारसायकलवरुन आलेल्या हल्लेखोरानं त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर 7 ते 8 गोळ्या झाडण्यात आल्या. यातील 4 गोळ्या बियाणी यांना लागल्याची माहिती आहे. तर त्यांच्या चालकालाही एक गोळी लागली आहे. खंडणीतून ही हत्या झाल्याचा संशय आहे. तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
खंडणीसाठी रींदा गँगनं धमकी दिली असताना त्यांची सुरक्षा का काढण्यात आली, असा सवाल खासदार प्रताप चिखलीकर यांनी केला आहे. या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
संजय बियाणी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घरी परतले. गाडीतून उतरून बियाणी घरामध्ये जात असताना दुचाकीवर त्यांचा पाठलाग करणारे दोघेजण त्यांच्या दिशेने आले. बियाणी यांना काही कळण्याच्या आत दोन्ही हल्लेखोरांनी आपल्या बंदुकीतून अगदी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. बियाणी तिथेच निपचित पडले. हल्लेखोरांनी घराचे गेट उघडणाऱ्या त्यांच्या घरात असणाऱ्या दुसऱ्या ड्रायव्हरवरही एक गोळी झाडली. संजय बियाणी यांना त्यांच्याच गाडीतून तात्काळ खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला.
बियाणी यांच्या हत्येने परिसरात तणावाचं वातावरण आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरु आहे.
बातमीचा व्हिडिओ