प्रफुल्ल पवार / अलिबाग : Bullock cart race at Murud : रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, स्पर्धेदरम्यान, अचानक बैल उधळले आणि स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये बैलगाडी घुसली. त्यानंतर एकच गोंधळ झाला. पळापळ पाहायला मिळाली. यावेळी तीन जण जखमी झालेत.
मुरुड तालुक्यातील नांदगाव इथं शर्यती दरम्यान बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसून झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाले. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. भाजपचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव समुद्रकिनारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शर्यती दरम्यान बैलगाडी प्रेक्षकांत घुसली आणि तिघे जखमी झालेत. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
स्पर्धा सुरु असताना बैल अचानक उधळले आणि एक बैलगाडी थेट प्रेक्षकांत घुसली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मागील 5 ते 6 वर्षे बैलगाडी शर्यतीवर बंदी होती. आता बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे गाडीवान आणि शौकिनामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, हा उत्साह आता जिवावर बेतला होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
बंदी उठवल्या नंतरही कोरोना प्रादुर्भावामुळे शर्यती सुरु होवू शकल्या नव्हत्या. आता प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा बैलगाडी शर्यती सुरु झाल्या आहेत. या शर्यतीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी नांदगाव किनारी मोठी गर्दी केली होती.