मोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा

Maharashtra News: एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात प्रसाद किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका कार्यक्रमादरम्यान एक अनुचित प्रकार घडला.   

सायली पाटील | Updated: Feb 21, 2024, 07:58 AM IST
मोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा title=
(प्रतिकात्मक छायाचित्र)/ buldhana news food poisoning 500 people get infected by contaminated food latest update

मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : माघ एकादशीच्या निमित्ताने सुरू असणाऱ्या एका धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने तब्बल पाचशे ते सहाशे भाविकांना विषबाधा झाली. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ही घटना घडली. लोणार तालुक्यातील सोमठाणा, खापरखेड या गावांमध्ये धार्मिक कार्यक्रम चालू होता यामध्ये उपवास असल्या कारणानं प्रसाद म्हणून भगर आणि शेंगदाण्याची आमटी करण्यात आली होती. 

कार्यक्रमानंतर तयार करण्यात आलेल्या या प्रसादाचं अर्थात भगर - आमटीचं संपूर्ण गावांमध्ये पंगतीमध्ये वाटप करण्यात आलं. उपस्थितांनी प्रसाद म्हणून देण्यात आलेले हे पदार्थ खाल्ले मात्र काही वेळानंतर त्यातील बऱ्याचजणांना मळमळ, चक्कर येणे, पोट दुःखी जाणवणे असा त्रास सुरू झाला. अनेकांना असा त्रास सुरू झाल्यानंतर भाविकांनी तत्काळ दवाखाने गाठले. डॉक्टरांच्या तपासणीनंतर या गावकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे अस लक्षात आलं. उपलब्ध माहितीनुसार साधारण पाचशे ते सहाशेजणांना ही विषबाधा झाल्याचं सांगण्यात आलं. बीबी येथील ग्रामीण रुग्णालय, मेहकर ग्रामीण रुग्णालय, लोणार ग्रामीण रुग्णालयामध्ये सुलतानपूर आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये या सर्व विषबाधित भाविकांना दाखल करण्यात आलं.

आरोग्य केंद्रांमध्ये वेगळंच आव्हान... 

धार्मिक कार्यक्रमांध्ये विषबाधा झालेल्या अनेकांनाच ज्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं, तिथं अपूरी जागा आणि डॉक्टरांची कमी असणारी संख्या अडचणींमध्ये आणखी भर टाकताना दिसली. रुग्णसंख्या वाढल्यामुळं बेडची संख्याही अपूरी असल्या कारणानं अनेक रुग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तर, काही प्रथमोपचार केंद्रांमध्ये डॉक्टरच गैरहजर असल्यानं रुग्णांवर वेळेवर उपचार करता आले नाहीत, ज्यामुळं काही रुग्णांची प्रकृती खालावली होती. 

हेसुद्धा वाचा : HSC Exams 2024 : आजपासून बारावीच्या परीक्षा; निकालाची तारीखही समोर

कार्यक्रमानंतर प्रसाद खाणाऱ्या अनेक भाविकांना त्रास होऊ लागताच कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ माजला. ज्यानंतर शक्य त्या मार्गानं विषबाधा झालेल्या भाविकांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयं आणि प्रथमोपचार केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, या संपूर्ण घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.