मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : बुलढाण्यात (Buldhana News) समृद्धी महामार्गावर (samruddhi highway) झालेल्या भीषण अपघाताच्या जखमा ताज्या असतानाच आणखी एक मोठा अपघात झाला आहे. बुलढाण्यातील मलकापूर (Malkapur) शहरातील महामार्ग क्रमांक सहावर हा भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर धडल्याने अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावर दोन ट्रॅव्हलचा समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डाण पुलावर हा अपघात घडला आहे. दोन बसची समोरासमोर धडक झाल्याने सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही ट्रॅव्हल पैकी एक अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तीर्थयात्री होते. तर दुसरी ट्रॅव्हल नागपूरवरून नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे.जखमी प्रवाशांना तात्काळ मलकापूर उपजिल्हा रुगणालयात दखल करण्यात आले आहे.
मलकापूरमध्ये बस उलटली
बुलढाण्यात मलकापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी बस उलटल्याने भीषण अपघात घडलाय. 55 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस उलटल्याने 10 ते 15 प्रवासी जखमी झाले आहेत. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं. ही बस थेट राजूर घाटात पलटी झाली. मलकापूर- बुलढाणा बसच्या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सध्या बाहेर काढण्यात आलं.
मलकापूरहून बुलढाणाकडे ही एसटी बस निघाली होती. मोहेगाव फाट्याजवळ बसला अपघात झाला. बस क्रमांक 8375 चा जॉईंटर निसटला आणि बस मागे जाऊ लागली. त्यामुळे चालक ब्रेक दाबत असताना एसटी बस पलटी झाली, अशी प्राथमिक माहिती बुलढाणा आगाराकडून माहिती देण्यात आली आहे.