नवी मुंबई : कोरोनाचे (CoronaVirus) संकट कायम असताना आता गैरव्यवहार होत असल्याची बाब पुढे आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या (Navi Mumbai) कोरोना चाचणी केंद्रातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. कुटुंबातील व्यक्तींच्या, मृतांच्याही नावाने बोगस कोरोना चाचण्या (corona tests) केल्याचे पुढे आले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मागणीनंतर महापालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश आहेत.
नवी मुंबई पालिकेच्या करोना चाचणी केंद्राकडून कुटुंबातील एकाच व्यक्तीची कोरोना टेस्ट करुन कुटुंबातील इतर व्यक्तींची टेस्ट न करता त्यांची कोरोना टेस्ट केल्याचे दाखवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा कोअर कमिटीचे सदस्य अंकुश कदम यांनी केला आहे. याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तात्काळ चौकशीची मागणी केली होती.
कोरोना चाचणी करण्यासाठी घरातील एखादी व्यक्ती महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रात गेल्यास, महापालिकेकडून त्या व्यक्तिची माहिती जाणून घेताना त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची देखील माहिती नोंद करुन घेतली जाते. त्यानंतर त्या व्यक्तिच्या कुटुंबातील व्यक्ती त्या केंद्रावर गेलेल्या नाही. तसेच त्यांनी कुठल्याही प्रकारची चाचणी केली नाही. असे असताना त्यांची कोरोना चाचणी झाल्याचे आणि त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे महापालिकेकडून दाखविण्यात येत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
तसेच याचे सर्व रिपोर्ट केंद्र शासनाच्या आय.सी.एम.आर. या साईटवर दाखविले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विभागातील टेस्टिंग केंद्रावर जाऊन स्वत:च्या कोरोना चाचण्या करुन घेतल्या. तसेच आपल्या कुटुंबियांची माहिती देताना मृत नातेवाईकांची नावे देखील दिली. यावेळी या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या खोट्या निगेटिव्ह चाचण्या करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. त्यात मृत लोकांची देखील कोरोना चाचणी निगेटिव्ह दाखवण्यात आल्याचे अंकुश कदम यांनी सांगितले.
याप्रकाराबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गुरुवारी सायंकाळी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. नवी मुंबईतील कोरोना चाचण्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तर याप्रकरणी बोगस करोना चाचण्या करण्यात आल्या संदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. याबाबत दोन प्रकारे चौकशी करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. ज्या कुटुंबातील बोगस व्यक्तींच्या नावे चाचण्या करण्यात आल्या आहेत, त्यांच्या घरी महापालिकेचे पथक जावून अधिक माहिती घेणार आहे. शिवाय त्या दिवशी त्या केंद्रातील एकूण चाचण्यांचा आढावा घेऊन या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.