Mumbai News Today: मुंबई महानगर पालिका लवकरच अंडरग्राउंड मार्केट सुरू करण्याच्या विचारात आहेत. दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी नुकतंच दिल्लीतील कॅनॉट येथील पालिका बाजाराला भेट दिली होती. त्यानुसार, तसा आराखडा पालिका अधिकारी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना सादर करणार आहेत.
फेरीवाला धोरण लागू न झाल्याने शहरातील रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण झाले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केसरकर यांनी दिल्ली पालिका बाजाराच्या धर्तीवर भूमिगत बाजार उभारण्याची सूचना केली आहे. फेरीवाला बाजार उभारण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांनी आपापल्या वॉर्डात मोकळी जागा निश्चित करण्याच्या सूचना वॉर्ड अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बाजार आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी दिल्लीतील दिल्लितील पालिका बाजाराला भेट दिली होती. हे मार्केट म्हणजे दिल्लीतील कॅनॉटच्या आतील आणि बाहेरी असलेल्या जागेत भूमिगत मार्केट आहे. यात विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणारी एकूण 398 दुकाने आहेत. याच धर्तीवर मुंबईतही ठिकठिकाणी मार्केट उभारण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे.
शहरातील सार्वजनिक खुल्या जागा आणि क्रिडांगणे आणि उद्यानासाठी राखील असलेल्या जमिनींच्या खाली शॉपिंग हबसारखे प्रकल्प प्रस्तावित आहेत. पालिका अधिकाऱ्यांनी दिल्लीतील मार्केटला भेट दिल्यानंतर या प्रकल्पाबाबतचा अहवाल काहीच दिवसांत पालकमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर नागरी उद्यान विभाग या प्रकल्पावर काम करेल, अशी माहिती समोर येतेय.
भूमिगत बाजारपेठेसाठी अधिकाऱ्यांनी 24 प्रशासकीय वॉर्डाच्या वॉर्ड अधिकाऱ्यांना क्रीडांगण किंवा उद्यान यासारख्या मोकळ्या जागा शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरुन या जागांच्या खाली भूमिगत बाजारपेठ उभारता येईल. ज्या परिसरातील लोकसंख्या जास्त असेल अशाच स्थानकाचा प्राधान्याने विचार केला जाईल, अशीही माहिती समोर येत आहे.
मुंबईच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवरही भर दिला आहे. विशेष प्रकल्पांसाठी तरतूद केली आहे. यात कोस्टल रोड प्रकल्पांसाठी 29000 कोटी. तर, दहिसर-भाईंदर लिंक रोड (कोस्टल रोड शेवटचा टप्पा) 220.00 कोटी, मुंबई कोस्टल रोड (उत्तर) वर्सोवा ते दहिसर 6 पॅकेजसाठी 1130.00 कोटी रुपयांची तरतूद. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड 1870 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.