भाजप दिवसाला २० लाख लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवणार

केंद्र सरकारकडे ज्या शिफारसी करायच्या आहेत, त्यांचे संकलन नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे करण्यात येणार आहेत.

Updated: Mar 27, 2020, 06:21 PM IST
भाजप दिवसाला २० लाख लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवणार title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: दररोज २० लाख गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य आणि शिधा पोहोचविण्याचा निर्धार आज महाराष्ट्रातील भाजपने केला आहे. राज्यातील सर्व आमदार आणि खासदारांशी आज राज्यातील प्रमुख नेते आणि केंद्रीय मंत्री यांनी संवाद साधला. केंद्रीय मंत्र्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर आमदार, खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात येत असलेल्या समस्या आणि त्यावर त्यांनी स्थानिक स्तरावर योजलेले उपाय याबाबत माहिती दिली आणि त्यातून अनेक संकल्पनांचे आदानप्रदान करण्यात आले.

केंद्र सरकारकडे ज्या शिफारसी करायच्या आहेत, त्यांचे संकलन नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे करण्यात येणार आहेत. जे विषय केंद्र सरकारकडून सोडवायचे आहेत, त्याचा पाठपुरावा हे दोन नेते करतील. हे दोन्ही नेते राज्यातील जिल्हा प्रशासनाच्या सुद्धा संपर्कात आहेत. 

सॅनेटाईझरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याने त्याला प्रतिबंध करणे आणि इथेनॉलनिर्मिती करणार्‍या कारखान्यांच्या मदतीने सॅनेटाईझरची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करून देणे, यासाठी नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी २४ तासात अन्न व औषधी प्रशासनाकडून प्रमाणपत्र मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. 

याशिवाय, भाजपकडून शेतमाल तसेच द्राक्ष, संत्रा, केळी आदी नाशिवंत माल वेळेत बाजारात पोहोचविणे यासाठी सुद्धा पुढाकार घेण्यात आला आहे. भाजीपाला आणि फळांची वाहतूक करणार्‍यांना पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अटकाव होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासाठी भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे.