पुणे : मुख्यमंत्रिपदाबाबतच्या फॉर्म्युल्यावरून शिवसेनेनं दगा दिल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे. पुण्यात भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाह यांनी आगामी पुणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकताना शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं दिसत आहे.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा लढवून दाखवा असं केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं. हे बोलताना त्यांनी शिवसेनेवरही टीका केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आधीच ठरलं होतं. मात्र शिवसेनेनं धोका दिला. आम्ही जे बोलतो ते करतो. त्यात आम्हाला अजिबात संकोच किंवा लज्जा नाही असा टोला त्यांनी लगावला.
मोदींच्या नावावर निवडून आले आणि विरोधकांसोबत गेले, हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.
यावेळी बोलतना शाह यांनी महाविकास आघाडीवरही टीकास्त्र सोडलं. महाविकास आघाडी सरकार केवळ 3 पायांचं सरकार नाही तर त्यांच्या चाकातही हवा नाही, ते फक्त धूर सोडतंय. आम्ही DBT योजना आणली. महाविकास आघाडीने त्याचा अर्थ डीलर, ब्रोकर, ट्रान्सफर असा घेतला.
पंतप्रधान मोदींनी इंधनावरचे दर कमी करा असं आवाहन केलं मात्र यांनी दारूवरचा कर कमी केला असं ते म्हणाले. 2019 च्या निवडणुकीत आमच्यासोबत विश्वासघात झाला. त्याची परतफेड करण्याची सुरुवात पुण्यापासून करुया असं आवाहन त्यांनी बुथ कार्यकर्त्यांना केलं.