क्रीडा जगतातून मोठी बातमी! प्रो लीगच्या चाचणीसाठी पैसे मागितले, पण खेळाडू पोहोचले तेव्हा...

प्रो लीग चाचणीसाठी जाहीरात दिली, खेळाडूंनी पैसे भरले, पण... लाखो रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार

Updated: Sep 30, 2022, 03:08 PM IST
क्रीडा जगतातून मोठी बातमी! प्रो लीगच्या चाचणीसाठी पैसे मागितले, पण खेळाडू पोहोचले तेव्हा... title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : प्रो लीग चाचणीच्या (Pro League Volleyball Trials) नावाखाली शेकडो व्हॉलीबॉल खेळाडूंची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये (Nagpur) उघडकीस आला आहे.  ज्युनियर प्रो व्हॉलीबॉल लीग खेळण्याच्या नावाखाली शेकडो व्हॉलीबॉलपटूंची ऑनलाइन फसवणुक (Online Fraud) करत ठकबाजाने खेळाडूंचाच गेम केला आहे. ज्युनियर प्रो व्हॉलीबॉल लीग चाचणीसाठी उदयोन्मुख व्हॉलीबॉलपटूकडून ऑनलाइन शुल्क (Online Fees) घेऊन ठकबाज पसार झाले आहेत. 

प्रार्थमिक अंदाजानुसार राज्यातील सुमारे 200 व्हॉलीबॉलपटूंची लाखोंची फसवणूक झाली आहे. नागपुरातील कामठी इथल्या यशोदा हॉस्पिटल (Yashoda Hospital) मैदानावर 25 सप्टेंबरला ज्युनिअर व्हॉलीबॉल लीगसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येत असल्याच काही भामट्यांनी सोशल मीडियावर (Social Media) प्रचार केला. त्याकरता त्यांनी उत्सुक व्हॉलीबॉलपटूना ऑनलाइन पैसे भरण्यास सांगितलं. हे पैसे किट करता घेत असल्याचंही त्यांनी चाचणीत येणाऱ्या व्हॉलीबॉलपटूंना सांगितलं. 

ठकबाजाने सोशल मीडियावरील टाकलेल्या फसव्या जाहिरातीला (Fraud Advertisement) अनेक उदयोन्मुख व्हॉलीबॉलपटू अडकले. केवळ नागपुरातीलच नव्हे राज्यातील अनेक जिल्ह्यातील खेळाडूंनी 800 पासून 5000 पर्यंत पैसे ऑनलाइन जमा केले. मात्र चाचणी करता हे खेळाडू ज्यावेळी कामठीत सांगण्यात आलेल्या मैदानावर पोहचले तेव्हा जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे कोणतंच मैदान तिथे नव्हतं. तसंच सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या जाहिरातीवरील मोबाईल क्रमांकही (Mobile Phone) बंद होता. त्यानंतर या व्हॉलीबॉलपटूंना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलं.

जिल्हा व्हॉलीबॉल संघटना ही करणार पोलिसात तक्रार 
दरम्यान नागपूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे (volleyball association nagpur) सचिव सुनील हांडे यांनी किमान 200 खेळाडूंची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. याप्रकरणी काही व्हॉलीबॉलपटूंनी पोलिसांत तक्रार केली आहे. या फसवणुकीची व्याप्ती खूप मोठी असण्याची शक्यता असून जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेकडून पोलिसात तक्रार देण्यात येणार आहे.