"जोडीदार अचानक निघून जाण्याचं दुःख..."; विधवा सूनेच्या हातून कुंकू लावून घेणाऱ्या सुप्रिया सुळेंचा कंठ दाटला

प्रथा परंपरांना फाटा देणारा सुप्रिया सुळेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Updated: Sep 30, 2022, 01:42 PM IST
"जोडीदार अचानक निघून जाण्याचं दुःख..."; विधवा सूनेच्या हातून कुंकू लावून घेणाऱ्या सुप्रिया सुळेंचा कंठ दाटला title=

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात (Maharashtra) विविध प्रकारच्या धार्मिक कार्यात विधवा महिलांना बाजूला ठेवण्याच्या जुन्या रितीरिवाजाला गेल्या काही दिवसांपासून फाटा देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी विधवा महिलांना (widowed woman) सुवासिनींचा मान देण्यात आल्याचे आपण पाहिलं असेल. याद्वारे जुन्या चालीरितींना फाटा देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनीही अशाच सामाजिक बदलाचा एक किस्सा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) उस्मानाबादच्या (osmanabad) दौऱ्यावर असताना त्यांनी एक इन्स्टाग्राम (instagram) पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. हे स्वागत एका विधवा महिलेच्या हातून झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या घरी भेट दिली होती. काही दिवसांपूर्वी वसंतराव नागदे यांच्या मुलाचं निधन झालं होतं. यावेळी वसंतराव नागदे हे मुलाच्या निधनाचं दुःख पचवून ते सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वसंतराव नागदे यांच्या सुनेच्या हस्ते सुप्रिया सुळेंचे स्वागत करण्यात आलं. यावेळी नागदे यांच्या सुनेला अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी वसंतराव यांचे कौतुक करत त्यांच्या सुनेला धीर दिला.

सुप्रिया सुळेंची इन्स्टाग्राम पोस्ट

"आयुष्यभराचा जोडीदार अचानक निघून जाण्याचं दुःख खुप मोठं आहे. पण त्यामुळे आयुष्य थांबू नये. प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा तो भरभरुन जगण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे. तिच्या पाठीशी तिच्या कुटुंबियांनी ठामपणाने उभं राहिलं पाहिजे. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या घरी भेट दिली, तेंव्हा वसंतरावांचा हा एक वेगळाच पैलू पहायला मिळाला. त्यांच्या मुलाचं नुकतंच निधन झाले. मुलाच्या निधनाचं दुःख पचवून ते सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. त्यांनी सुनेच्या हातून आम्हा सर्वांचे स्वागत केले. स्वागताचे कुंकू लावताना सुनबाईंचा हात थरथरला पण वसंतरावांनी तिला धीर दिला. हा सगळा प्रसंग अतिशय भावूक करणारा,नवी दिशा देणारा आणि आश्वासक असा होता," असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

दरम्यान, धार्मिक कार्यक्रमात पूर्वी विधवांना प्रवेश दिला जात नव्हता. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये महिला सुवासिनीदेखील प्रथेनुसार विधवांना प्रवेश टाळायच्या. मात्र आता अनेक ठिकाणी विधवा महिलांच्या हळदी-कुंकवाचे कार्यक्रम होत असल्याचे पाहायला मिळत आहे.