मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा बडा नेता आणि माजी मंत्री शिंदे सरकारच्या कॅबिनेटमध्ये जाणार असल्याच्या माहिती सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चांणा उधाण आलं आहे. काँग्रेसचा ज्येष्ठ नेता कोण?, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं असून काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
ज्येष्ठ नेत्यासोबत काँग्रेसचे 9 आमदार फुटणार असल्याची माहिती समजत आहे. शिवसेनेनंतर आता काँग्रेसमधीलही एक गट फुटून शिंदे सरकारमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे काँग्रेस गटामधील बंडखोर आमदारांची मंत्रिपदावर वर्णी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजप 2024 ची लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच जुळवाजुळव करू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसमध्ये असलेली धुसफूस गेल्या अनेक दिवसांपासून उघडपणे दिसत होती. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसची 6 मतं फुटल्याचं समोर आलं होतं.
दरम्यान, अशोक चव्हाण नाराज असल्याच्या चर्चांणा उधाण आलं होतं. चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत मात्र यावर बोलताना, मी नाराज नसून पक्ष सोडण्याच्या चर्चा या वावड्या असल्याची प्रतिक्रिया चव्हाणांनी दिली होती.