रेल्वे कर्मचाऱ्याने लग्नाच्या 5 महिन्यांतच आई आणि पत्नीला संपवलं; कारण वाचून उडेल थरकाप

Bhusawal Crime : भुसावळ शहरात घडलेल्या या घटनेमुळे दहशत निर्माण झाली आहे. नुकतेच लग्न झालेल्या आरोपी पतीने पत्नी आणि आईची निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भुसावळ पोलिसांनी हत्येचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.

आकाश नेटके | Updated: May 23, 2023, 02:09 PM IST
रेल्वे कर्मचाऱ्याने लग्नाच्या 5 महिन्यांतच आई आणि पत्नीला संपवलं; कारण वाचून उडेल थरकाप title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, भुसावळ : नेहमी गुन्हेगारी कृत्यांमुळे चर्चेत असणार्‍या भुसावळ (Bhusawal News) शहरात सोमवारी रात्री पुन्हा एकदा डबल मर्डर (Bhusawal Crime) झाल्याने खळबळ उडाली आहे. तर याच घटनेत एकाची प्रकृती गंभीर असल्याचे असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी मुलाने पत्नी आणि आईची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी (Bhusawal Police) आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे.

भुसावळ शहरातील वांजोळा रोडवर असलेल्या बालाजी लॉन मागील शगुन इस्टेट मध्ये रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या आईसह पत्नीचा निर्घृणपणे खून केल्याची घटना  मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.

आराध्या हेमंत भूषण (वय वर्ष 23) आणि सुशीला देवी भूषण (वय वर्ष 63) अशी मृतांची नावे आहेत. तर हेमंत श्रवण कुमार भूषण असे संशयित आरोपीचे नाव आहे. हेमंत श्रवण भूषण हा रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी आहे.  हेमंत कुमार भूषण हा त्याची आई आणि पत्नीसह वास्‍तव्‍यास होता. हेमंत याचा काही महिन्‍यांपुर्वीच विवाह झाला होता. कौटुंबिक वादातून वादातून त्याने आई सुशीलादेवी आणि पत्नी आराध्या हेमंत कुमार भूषण यांची तव्याने मारहाण करत हत्‍या केली.

नेमकं काय घडलं?

भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील शगुन इस्टेट येथील रहिवासी हेमंत कुमार भूषण हा रेल्वेत नोकरीला आहे. पाच महिन्यांपूर्वीच म्हणजे 2 डिसेंबर 2022 रोजी हेमंतचे आराध्यासोबत लग्न झाले होते. कौटुंबिक वादातून सातत्याने त्याचे कुटुंबियांसोबत भांडण होत होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी हेमंत कुमार भूषणचा मेव्हणा रिषभ हा सुद्धा त्याच्या भुसावळ शहरातील घरी आला होता. मात्र हेमंत कुमारच्या मनात राग कायम होता. याच रागाच्या भरात त्याने पत्नी आणि आईवर लोखंडी तव्याने झोपेतच हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाल्या. आरडाओरडा ऐकून रिषभ तिथे पोहोचला आणि त्याने हेमंत कुमारला पकडून ठेवले. मात्र त्याच्या तावडीतून सुटत हेमंत कुमारने पुन्हा आई आणि पत्नीवर हल्ला केला आणि त्यांना संपवले. या हल्ल्यात रिषभदेखील गंभीर जखमी झाला आहे. रिषभवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी काय सांगितले?

"कौटुंबिक कारणातून हेमंत कुमारने त्याची आई आणि पत्नीचा खून केला आहे. हेमंत कुमारने मेव्हण्याला देखील जबर जखमी केले आहे. मेव्हण्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी आमच्या ताब्यात असून कौटुंबिक वादातून हा सर्व प्रकार घडल्याची कबुली त्याने दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे," अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एस कुमार यांनी दिली.