आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत (HSC Board Exams). या परिक्षादरम्यान एक विचित्र प्रकार घडला आहे. बारावीची परीक्षा द्यायला गेलेले विद्यार्थी थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या पेलोरा गावातील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर मधमाशांनी हल्ला (Bee attack) केला. यात तीन विद्यार्थी आणि एक शिक्षक जखमी झालेत.
राज्यभर सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. आज चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या पेलोरा गावातील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर ( केंद्र क्रमांक 0247 ) प्रवेशद्वाराजवळ मधमाशांनी हल्ला चढवल्यामुळे तीन विद्यार्थी व शिक्षक जखमी झालेत. ही घटना परिक्षा सुरु होण्याच्या आधी घडली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला.
जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठवण्यात आले. नेहमीप्रमाणे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी प्रवेश करत असताना प्रवेशद्वारापाशी हा प्रकार घडला. सुरज भिमनकर आणि तेजस मुके हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
या दोघांना उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पेलोरा येथील परीक्षा केंद्रावर एकूण 96 विद्यार्थी परीक्षा देत होते. घटनेत दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना परीक्षेला उपस्थित होत आले नाही. या घटनेची माहिती केंद्रप्रमुख यांनी कस्टोडियन व बोर्डाला कळविली असल्याची माहिती केंद्र प्रमुखांनी दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात बारावीच्या काही परीक्षा केंद्रावर कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. परीक्षा केंद्रातून मोबाईलवर पेपर व्हायरलचा प्रकार तसेच मोठ्या प्रमाणात कॉपी आणि मोबाईल जप्त होत असतानाच कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना कॉपी पुरविणाऱ्यांची केंद्रावर झुंबड उडत आहे. पुसदच्या काटखेडा येथील असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात बाहेरून परीक्षा केंद्रात कॉपी पाठविण्यासाठी तरुणांची धडपड व गोंगाट होत असल्याचे दिसून येत आहे. या खुलेआम कॉपी प्रकरणामुळे शिक्षण विभागाच्या पथकावर, सुरक्षा व्यवस्था व परीक्षा केंद्रातील नियुक्त शिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यभरात यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. यावर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.