'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्स

बारामती मतदारसंघातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुण्याच्या इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर पाहायला मिळाले. 

Updated: Jun 2, 2024, 12:39 PM IST
'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्स title=

Sunetra Pawar vs Supriya Sule Banner : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. यानंतर आता संपूर्ण देशभरात निवडणुकांच्या निकालाची प्रतीक्षा आहे. येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाआधी महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांकडून आपपल्या नेत्यांच्या विजयांचे बॅनर्स झळकवले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. आता बारामती मतदारसंघातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुण्याच्या इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर पाहायला मिळाले. 

इंदापुरात सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच पुण्याच्या इंदापुरात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले आहेत. "गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच ठेवा, महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार या बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन", असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम बागवान यांनी हा विजयाचा बॅनर लावला आहे.

Sunetra Pawar Banner

शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर

काल निकालापूर्वीच इंदापुरात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकले होते. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली. एकूणच इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर रंगल्याचे पहायला मिळत आहे. 

बारामतीतील बॅनर्सची सगळीकडे चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तासच शिल्लक आहेत. इंदापुरात काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावले होते. त्या बॅनर्सची सर्वत्र चर्चा रंगली होती. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष वसिम बागवान यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावले आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच लावलेल्या या बॅनर्समुळे चर्चांना उधाण आले आहे.  

बारामतीत नणंद विरुद्ध भावजय सामना

दरम्यान यंदा लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळाला. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार व अजित पवार असे दोन गट तयार झाले होते. हे दोन्ही गट लोकसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहिले. बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना रंगला. यात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली. तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली गेली. सुनेत्रा पवार यांच्या प्रचासाठी अजित पवारांनी अनेक प्रचार सभा घेतल्या होत्या. त्यामुळे आता येत्या 4 जूनला बारामती मतदारसंघाचा निकाल काय लागणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.