बंडातात्या कडाडले; देहूच्या वेशीवरून थेट सरकारला इशारा

 संत तुकाराम महाराज यांचा देहू येथील बिजोत्सव सोहळा 50 जणांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत

Updated: Mar 30, 2021, 08:32 AM IST
बंडातात्या कडाडले; देहूच्या वेशीवरून थेट सरकारला इशारा title=

पुणे : राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता संत तुकाराम महाराज यांचा देहू येथील बिजोत्सव सोहळा 50 जणांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याविरोधात काल वारकऱ्यांनी देहूमध्ये भजन सत्याग्रह केला.

राज्यासह पुणे जिल्ह्यातही कोरोना संसर्ग बेफाम गतीने पसरत असल्यामुळे जिल्हा आणि राज्य प्रशासन अनेक कठोर निर्बंध लादत आहे. समस्त वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या देहूनगरीत बिजोत्सव सोहळा पार पडतो. सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होतात. 

परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बिजोत्सव सोहळ्यासाठी 50 लोकांच्या उपस्थितीचे आदेश दिले आहेत. 

वारकऱ्यांच्यावतीने बंडातात्या कराडकर यांनी काल प्रशासनाच्या आदेशाला कडाडून विरोध केला आहे. काल त्यांनी देहूमध्ये शेकडो वारकऱ्यांसह भजन सत्याग्रह केला. बंडातात्या यांना पोलिसांनी देहूच्या वेशीवरच अडवून ठेवले होते. त्यामुळे त्यांनी वेशीवरच ठाण मांडून भजन कीर्तन सुरु ठेवले.
 
 पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. बंडातात्या यांनी 5 प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर आंदोलन  करणाऱ असल्याचा इशारा बंडातात्या यांनी सरकारला दिला आहे. त्यात आषाढी वारी ही पायीच झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.