मंत्रिमंडळ विस्ताराआधी बाळासाहेब थोरात सोनिया गांधींच्या भेटीला

राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार उद्या होत आहे

Updated: Dec 29, 2019, 03:16 PM IST
मंत्रिमंडळ विस्ताराआधी बाळासाहेब थोरात सोनिया गांधींच्या भेटीला  title=

नवी दिल्ली : राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार उद्या होत आहे. त्याआधी आज दुपारी साडेतीन वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसचे जे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांच्या नावावर सोनिया गांधी शिक्कामोर्तब करणार आहेत. दरम्यान त्याआधी के. सी. वेणूगोपाल यांची थोरात यांनी भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

महाविकासआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार हा अधिवेशनानंतर होणार होता. पण काँग्रेसची यादी दिल्लीतून येण्यात उशीर झाल्यामुळे हा विस्तार लांबल्याचं बोललं जातं आहे. यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला टोला देखील लगावला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या यादीला हिरवा कंदील दिला.

ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबरला होत आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी विधिमंडळ परिसरमध्ये सुरू आहे . विधिमंडळ परिसरातील पार्किंगच्या जागेत मुख्य स्टेज उभारण्यात आला आहे. 500 पेक्षा अधिक जणांच्या बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या मंडपामध्ये 10 पेक्षा जास्त स्क्रीन उभारले जात आहेत. विधिमंडळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

महाराष्ट्रविकासआघाडी सरकारचा पहिला आणि बराच काळ लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार उद्या होत आहे. विधानभवनाच्या समोरील प्रांगणात हा विस्तार पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी 28 नोव्हेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर महिनाभरापासून सात मंत्रीच राज्याचा कारभार बघत आहेत. या सरकारचा विस्तार लांबत असल्यानं विरोधकांकडूनही टीका होत होती.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेतील. त्यात १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ मंत्री शपथ घेतील. त्यात १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री शपथ घेणारेत. तर काँग्रेसचेही १० मंत्री शपथ घेणार असून यात ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.