Akshay Shinde Encounter : बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) सोमवारी एनकाऊंटर करण्यात आला. तळोजा जेलमधून (Taloja Jail) अक्षय शिंदेला रिमांडसाठी नेलं जात असताना मुंब्रा बायपास (Mumbra Bypass Rd) या ठिकाणी आरोपी अक्षय शिंदेने एपीआय निलेश मोरे यांच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर खेचली आणि गोळ्या झाडल्या. त्यातली एक गोळी निलेश मोरेंच्या पायात गेली. त्यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या अक्षय शिंदेला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्याचा विस्तृत जबाब
आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तारादाखल केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेवर गोळी झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे संजय शिंदे (Sanjay Shinde). पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी पोलीस व्हॅनमध्ये नेमकं काय घडलं याचा जबाब दिला आहे. मुंब्रा पोलिसांनी नोंदवल्या जबाबात संजय शिंदे यंनी सविस्तर माहिती दिली आहे.
पोलीस व्हॅनमध्ये नेमकं काय घडलं?
सोमवारी 23 सटेंबरला तळोजा मध्यवर्ती कारागृहातून आरोपी अक्षय शिंदेला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला घेऊन आम्ही ठाणे शहराच्या दिशेने निघालो, मी (संजय शिंदे) पोलीस व्हॅनमध्ये पुढे बसलो होतो, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि दोन अंमलदार आरोपीसह वाहनाच्या मागे बसले होते. पोलीस व्हॅन शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आली असताना निलेश मोरे यांनी मला अक्षय शिंदे हा, 'मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात? आता मी काय केलं आहे?', असे रागाने बोलत असून शिवीगाळ करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे मी वाहन थांबवून आरोपीला शांत करण्याच्या उद्देशाने मागे येऊन बसलो. आम्ही सरकारी वाहनाने आरोपी अक्षय शिंदे यास घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्याजवळ आलो असता संध्याकाळी 6.15 च्या सुमारास आरोपी अक्षय शिंदे हा अचानक निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेले सरकारी पिस्तुल बळाचा वापर करुन खेचू लागला. अक्षय पिस्तुल हिसकवण्याचा प्रयत्न करत असताना अक्षय शिंदेला अडविण्याचा प्रयत्न केला.
अक्षय शिंदेने गोळी झाडली
आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळी 'मला जाऊ द्या', असं म्हणत होता. झटापटीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे पिस्टल लोड झालं आणि त्यातील 1 राउंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले. त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांचे पिस्तुलचा ताबा घेऊन 'आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही' असं रागारागाने ओरडू लागाला, त्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याने माझ्या आणि हरिश तावडे यांच्या दिशेने त्याच्या हातातील पिस्तूलाने आमच्यावर 2 गोळ्या झाडल्या. पण आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत.
आरोपीच्या दिशेने गोळ्या झाडल्या
आरोपी अक्षय शिंदे आम्हाला गोळ्या झाडून जीवे मारणार अशी खात्री झाल्याने मी प्रसंगावधान राखत स्वसंरक्षणार्थ माझ्याकडील पिस्तुलाने एक गोळी आरोपी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडली. त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला आणि त्याच्या हातातील पिस्तुलचा ताबा सुटला, त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदेवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर पोलीस व्हॅन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पीटल इथं अक्षयला आणलं तर मला आणि निलेश मोरे यांनी पुढील औषधोपचरासाठी ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे मला नंतर समजलं.