Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक निर्णय आपल्याला पटले असून पुन्हा त्याच पदावर पाहण्याची इच्छा असल्याने आपण केवळ त्यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरेंना गुढीपाडवा मेळाव्यात केली. त्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच राज ठाकरेंनी महायुतीसाठी जाहीर सभा घेतली. कणकवलीमध्ये नारायण राणेंच्या प्रचारासाठी सभा घेताना राज यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आता पुढील काही आठवडे राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेताना दिसतील. मात्र सध्याच्या राजकीय भूमिकेशिवाय राज ठाकरे हे कायमच महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वाचे नेते म्हणून चर्चेत असतात. त्यांची भाषण, भाषणांमधील शाब्दिक फटकेबाजी, त्यांच्यातील व्यंगचित्रकार सारं काही अगदी राजकीय वर्तुळापासून सोशल मीडियापर्यंत चर्चेत असतं. अशीच एक चर्चेची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंचा दिनक्रम. अनेकदा विरोधक राज ठाकरेंवर टीका करताना ते दुपारी उठतात असा संदर्भ देताना दिसतात.
सर्वात आधी एका भाषणामध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांनी राज ठाकरेंच्या दिनक्रमावरुन टोला लागवला होता. त्यानंतर अनेकदा याचा उल्लेख वेगवेगळ्या मंचांवरुन विरोधकांनी केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनीही अनेकदा आपल्या सभांमधून, 'उठ दुपारी, घे सुपारी', म्हणत खोचपणे राज ठाकरेंना टोले लगावल्याचं पाहायला मिळालं.
अगदी सोशल मीडियावरही राज ठाकरे दुपारी उठतात अशासंदर्भातील अनेक प्रतिक्रिया त्यांच्या विधानांवरील बातम्यांवर पाहायला मिळायच्या. आता राज ठाकरेंनीच ते नेमके किती वाजता झोपेतून उठतात आणि त्यांचा दिनक्रम काय असतो याबद्दलचा खुलासा 'बोल भिडू'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. राज ठाकरेंचे राजकीय पैलू वगळून इतर बाबींवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली आहेत. 'चला हवा येऊ द्या'मधील पत्र लिहिणारे प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी राज ठाकरेंची ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत जगताप यांनी राज ठाकरे सकाळी नेमके किती वाजता उठतात? असा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारुन जगताप यांनीच पुढे महाराष्ट्राला त्यांच्या सकाळी उठण्यासंदर्भात गैरसमज झाला असावा, असं म्हणत प्रश्नाचं उत्तर देण्याची विनंती केली.
नक्की वाचा >> महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
राज ठाकरेंनीही अगदी दिलखुलासपणे या प्रश्नाला उत्तर देताना जगताप यांच्या शेवटच्या प्रतिक्रियेला प्रतिसाद देत, 'माझ्याबद्दल गैरसमज असलेले बरे,' असं म्हणत उत्तराला सुरुवात केली. 'माझ्या दिनचर्येबद्दल बोलायचं झाल्यास मी सकाळी 5 वाजता उठतो. मी 6 वाजता टेनिस खेळायला जातो. मागील काही दिवसांपासून टेनिस कोर्टची दुरुस्ती सुरु असल्याने सध्या टेनिस बंद आहे. दुरुस्तीनंतर पुन्हा सुरु होईल,' असं राज म्हणाले. तसेच आपण सकाळी 8 ते 8.30 पासूनच लोकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात करतो असं राज म्हणाले. लोकांच्या भेटीगाठींना राज यांनी डॉक्टरांच्या भाषेत वापरला जाणारा ओपीडी हा शब्द वापरत प्रतिक्रिया नोंदवली. "सकाळी 8 किंवा 8.30 ला माझी ओपीडी सुरु होते. त्यामुळे मी उशीरा उठलो, असे कधी झाले नाही," असं राज यांनी जगताप यांना सांगितलं.
राज ठाकरेंनी याच प्रश्नाच्या संदर्भातून पुढे बोलताना काहीही झालं तरी किमान 8 तास झोपलं पाहिजे असंही म्हटलं. झोपेचं महत्त्व सांगताना त्यांनी, "मी माझ्या महाविद्यालयीन दिवसांपासूनच झोपेसंदर्भात काळजी घेतो. किमान 8 तास झोपलं पाहिजे. असं झालं नाही तर माणूस आजारी पडू शकतो. दिवसभर ग्लानी येण्याऐवजी झोप घेतलेली बरी," असं राज म्हणाले.