Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमधून राज ठाकरेंनी त्यांचे चुलत बंधू आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी दोनच दिवसापूर्वी कणकवलीमधील सभेमध्ये महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असल्याचा उल्लेख करत केलेल्या टीकेवरुन राज यांनी निशाणा साधाला. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे जात आहेत? याचा जाब विचारला. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेच मागील 10 वर्षांपैकी साडेसात वर्ष सत्तेत होते, असा संदर्भही दिला.
विनाशकारी प्रकल्प माहाराष्ट्राच्या माथी मारुन येथील तोंडचा घास काढून गुजरातला न्याल तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचे खासदार विनायक राऊत यांच्या कणकवलीतील प्रचारसभेमध्ये शुक्रवारी दिला होता. याच मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी उद्धव यांना लक्ष्य केलं. "काल इकडे येऊन सांगितलं की कोकणामधले उद्योग धंदे हे गुजरातला जात आहेत. वा रे वा! 2014 ते 2019 त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होतात. 2019 ते 2023 तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. म्हणजे महाराष्ट्रातील गेल्या 10 वर्षातील साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते. का गेले उद्योगधंदे बाहेर? का नाही विरोध केला तुम्ही? उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार. आमदार पाठिंबा देणार. आपण का विरोध करतो हे तरी माहिती आहे का? तर माहित नाही अशी स्थिती आहे," असा टोला राज यांनी लगावला.
पुढे बोलातना राज ठाकरेंनी जैतापूर प्रकल्पाचं उदाहरण दिलं. "जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प... कोकणाचा नाश होईल. तिथे जर स्फोट झाला तर काय होईल? हेच आलं ना तुमच्यासमोर? मी बरोबर बोलतोय ना? मी एक यादी वाचून दाखवतो. मी जगातलं नाही भारतातलं बोलतोय. आता भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत? गुजरात स्थापना 1993, तामिळनाडू स्थापना 1984, उत्तर प्रदेश स्थापना 1991, कर्नाटक 2000, राजस्थान 1980, महाराष्ट्र 1969, तामिळनाडू 2013 एवढे अणुऊर्जा प्रकल्प आता भारतामध्ये आहेत. सर्वात महत्त्वाचं याचं स्फोटो झाला तर किती कोकणात किती माणसं मरतील ही चिंता असणाऱ्यांना हे माहिती नाही का भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र मुंबईत आहे. न्युक्लिएर रिअॅक्टरचा स्फोट होतो. न्युक्लिएर रिअॅक्टर मुंबईत आहे. भाबा अणुऊर्जा केंद्र दूर लोटा असं कधी मी ऐकलं नाही. पण कोकणात प्रकल्प आला की विरोध करायचा," असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी नाणार प्रकल्पाचा संदर्भ देत कोकणातील लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला. "नाणारमध्येही विरोध करत बागायती शेती जाणार वगैरे टीका झाली. पण हे सगळं नंतर सध्या नाणारमध्ये जेवढी जमीन संपादित केलेली आहे तिथे जमीन आली कुठून? इथे फिरणाऱ्या दलालांनी कमी पैशात जमीन लोकांकडून वित घेतली. मग यांनी नाणारला विरोध केला. मग काय मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रकल्प बारसूला हलवा. बारसूला म्हणे 5 हजार एकर जमीन सापडली कशी? म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती. मी बोलतोय ते वर वर घेऊ नका. हे सगळे जमीनीचे व्यवहार आहेत. यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या जमीनी घेऊन ठेवल्या आहेत तिथे जास्त मोलाने सरकार जास्त पैसे देतं. म्हणजे तुमच्याकडून 10 रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडून 200 रुपये घ्यायचे हे सगळे धंदे कोकणात सुरु आहेत. त्यासाठी पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा. जमीनीच्या किंमती वाढवायची मग या सगळ्या गोष्टी करायच्या. हा इथला खासदार आहे ना त्यांचे हेच धंदे सुरु आहेत यांना बळी पडायचं आहे का तुम्हाला?" असा सवाल राज ठाकरेंनी केला.