शशिकांत पाटील, झी २४ तास, लातूर : विधानसभा निवडणूक २०१९ साठी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील बाभळगाव येथे आज देशमुख कुटुंबियांनी मतदान केलं. विलासराव देशमुख यांच्या पत्नी श्रीमती वैशालीताई देशमुख, माजी राज्यमंत्री अमित देशमुख, त्यांच्या पत्नी अदिती देशमुख, अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख, धीरज देशमुख आणि त्यांची पत्नी दिपशिखा देशमुख तसंच माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मतदान केलं.
Go exercise your right!! Go Vote !!! pic.twitter.com/7UlpZwl3EF
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 21, 2019
महाराष्ट्रातल्या इतर काही ठिकाणांप्रमाणेच लातूर जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसाचा मतदारांना थोडा त्रास होत असल्याचं रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी म्हटलंय.
विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान सुरू आहे. यासाठी एकंदर ३ हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यात एकूण ८ कोटी ९८ लाख मतदार आहेत. तर मतदानासाठी राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच १ लाख ३५ हजार व्हीव्ही-पॅट यंत्रांची सर्व २८८ मतदारसंघांमध्ये सुविधा पुरवण्यात आली आहे. तर सहा लाखांहून अधिक कर्मचारी आणि तीन लाख पोलीस मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.