सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर राख उरते. मृत व्यक्तीच्या अस्थी हा त्यांच्या नातेवाईकांसाठी आस्थेचा भाग असतो. पण पंढरपुरात मृतांच्या नातेवाईकांच्या भावनांशी खेळ होतो आहे. कारण तिथं मृतदेहांची राखच चोरली जाते आहे. पंढरपुरातल्या स्मशानातली रात्रीच्या वेळे घडणारी ही घटना अनेकांना हैराण करणारी आहे.
चक्क स्मशानात मृतदेहांची राख चोरी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात हे सातत्यानं घडतं आहे. पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरावर स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत ज्या दिवशी मृतावर अंत्यसंस्कार होतात. त्याच रात्री मृतदेहाची राख चोरली जाते आहे. त्यामुळं अनेक लोकांना अंत्यसंस्कारानंतर अस्थीच मिळेनाशा झाल्यात. जाणकारांच्या माहितीनुसार मृतदेहांवर सोन्याचे दागिन्यांसह अंत्यसंस्कार केले जातात. त्या मृतदेहांच्या राखेतून मिळणाऱ्या सोन्यावर डोळा ठेऊन राख चोरली जाते आहे.
ही बाब जेव्हा नगरपरिषदेच्या लक्षात आणून दिली तेव्हा त्यांनी स्मशानात सीसीटीव्ही लावणार असून २४ तास चौकीदार नेमणार असल्याचं सांगितलं. आप्तेष्ठांच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थींबाबत नातेवाईक खूप हळवे असतात. त्यामुळं स्मशानातील सोनं चोरणाऱ्या या चोरांवर जरब बसेल अशी कारवाई करण्याची मागणी होते आहे.