'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोल

Shinde MP Slams Ex CM Uddhav Thaackeray: उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी एक कविता पोस्ट करत कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं असून सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 23, 2024, 10:32 AM IST
'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोल title=
उद्धव ठाकरेंवर केली टीका

Shinde MP Slams Ex CM Uddhav Thaackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घाणाघाती टीका केली आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचे दोन फोटो पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांची भेट घेतल्याच्या मुद्यावरुन नरेश म्हस्केंनी ही टीका केली आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

शिंदे गटाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तसेच प्रवक्ते असलेल्या म्हस्के यांनी एक कविता पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. म्हस्के यांनी ही कविता पोस्ट करताना उद्धव ठाकरेंनी आबू आझमींची भेट घेतल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आझमी उद्धव ठाकरेंच्या हातून पुष्पगुच्छ स्वीकारताना दिसत असून शाल देऊन आझमींचं स्वागत झाल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत अबू आझमी बाबरी मशीदीचं बॅनर घेऊन उभे आहेत. या बॅनरवर 'बाबरी मशिदीला न्याय कधी मिळणार?' असं लिहिलेलं आहे. 

हे दोन्ही फोटो शेअर करताना म्हस्केंनी, "लाज वाटते रे! तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची," असं म्हणत एक कविताच पोस्ट केली आहे. "लाज वाटते रे! तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची... एक तरी खूण जोपासा, त्यांचं रक्त असल्याची... हिरव्या अवलादींना आणून त्यांना कुर्निसात करता... हिंदुत्वाची खोटी नाटकं लोकांसमोर करता," असं पहिल्या दोन कडव्यांमध्ये म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

म्हस्केंनी पोस्ट केलेल्या कवितेमधील शेवटची कडवी पुढील प्रमाणे आहेत...

ज्या राक्षसाने शेकडो कारसेवकांचे मुडदे पाडले,
ज्या दैत्याने शेकडो हिंदू अयोध्येत गाडले.

त्याला जवळ घेता आणि गप्पा हिंदुत्वाच्या मारता,
अरे षंढ मुर्दाडांनो! कोणाला तुम्ही फसवता?

बाळासाहेब म्हटले होते, बाबरी पडणाऱ्यांचा गर्व आहे.
तुम्ही कारसेवकांच्या खुन्यांचा सत्कार करता, यातच सारे मर्म आहे.

लाज वाटते रे! साहेबांचे रक्त, असे हिरवे हिरवे होताना पाहून,
किती क्लेश होत असतील साहेबांना तिथे स्वर्गात राहून....

अनेकदा साधलाय ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, शिंदे गटाच्या या टीकेला अजून ठाकरे गटाकडून कोणीही काहीही उत्तर दिलेलं नाही. यापूर्वीही म्हस्के यांनी शिंदे गटाचं प्रवक्तेपद स्वीकारल्यापासून वेळोवेळी ठाकरे कुटुंबावर टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. अगदी आदित्य ठाकरेंवरही त्यांनी अनेकदा टीका केल्याचं दिसून आलं आहे.