मुंबईतून कल्याण, विरार गाठा फक्त 59 मिनिटांत; हे नवे सात मार्ग मुंबईचा चेहराच बदलणार

Mumbai News Today: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एमएमआरडीए नवी योजना घेऊन येत आहे. यामुळं प्रवाशांचा अर्धा अधिक वेळेची बचत होणार आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 24, 2024, 11:33 AM IST
मुंबईतून कल्याण, विरार गाठा फक्त 59 मिनिटांत; हे नवे सात मार्ग मुंबईचा चेहराच बदलणार  title=
Around Mumbai in 1 hour 7 Ring Roads that will minimise travel time by 2029

Mumbai News Today:  वाहतूक कोंडीची समस्या ही मुंबईत आता नेहमीची झाली आहे. मुंबईकरांचा अर्धा अधिक वेळ वाहतूक कोंडीत जातो. मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी MMRDA मुंबई महनगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गंत मुंबईत 90 किमीचं रस्त्यांचं जाळ तयार करण्यात येणार आहे. यात उड्डाणपूल, महामार्ग आणि अनेक भुयारी मार्गांचा समावेश असणार आहे. 

मुंबईलगतच्या शहरात म्हणजेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, खोपोली, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार येथे राहणाऱ्या लोकांना दररोज दोन ते चार तास प्रवास करत असतात. प्रवाशांचा दिवसातील अर्धा वेळ प्रवासातच निघून जातो. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी एमएमआरडीएने ही योजना आणली आहे. एमएमआरडीने तयार केलेल्या योजनेनुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये मिळून सात आऊटर आणि इनर रिंग रोड बनवले जाणार आहेत. हे सात रिंग रोड तयार झाल्यानंतर मुंबईकर 59 मिनिटांच्या  आत शहर व उपनगरातील कोणत्याही ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतात. मुंबईचा पूर्व व पश्चिम भाग अनेक रस्त्यांनी जोडला जाणार आहे. हा प्रकल्प 2029पर्यंत पूर्ण होणार आहे. पाच वर्षांत मुंबईचा चेहरा-मोहराच बदलणार आहे. 

मार्ग कसा असणार 

1) पहिला रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरू होणार आहे. नरीमन पॉईंट-कोस्टल रोड-वरळी-शिवडी कनेक्टर-पूर्व द्रुतगती मार्ग-ऑरेंज गेट टनल-नरीमन पॉईंट

2) दुसरा रिंग रोड नरीमन पॉईंटपासून वांद्रे-वरळी सागरी सेतू-सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड- पश्चिम द्रुतगती महामार्ग-पूर्व द्रूतगती मार्ग-ऑरेंज गेट टनल-नरीमन पॉइंट

3) तिसरा रिंग रोड नरीमन पॉईंटपासून वांद्रे वरळी सागरी सेतू-पश्चिम द्रुतगती महामार्ग-जेव्हीएलआर-कांजुरमार्ग जंक्शन-पूर्व द्रुतगती मार्ग एक्स्पटेन्शन-पूर्व द्रुतगती मार्ग-ऑरेंज गेट टनल-नरीमन पॉईंट

4) चौथा रिंग रोड नरीमन पॉईंटपासून वांद्रे-वरळी सागरी सेतू-वर्सोवा वांद्रे सागरी सेतू-वर्सोवा दहिसर लिंक रोड- गोरेगाव मुलुंड लिंक रोड-पूर्व द्रुतगती मार्ग एक्स्टेन्शन-पूर्व द्रुतगती मार्ग-ऑरेंज गेट टनल-नरीमन पॉईंट

5) पाचवा रिंग रोड नरीमन पॉईंटपासून वांद्रे वरळी सागरी सेतू-वर्सोवा वांद्रे सागरी सेतू-वर्सोवा दहिसर लिंक रोड- भाईंदर फाउंटेन कनेक्टर-गायमुख घोडबंदर टनल- ठाणे कोस्टल रोड- आनंद नगर- साकेत उड्डाणपूल -पूर्व द्रुतगती मार्ग एक्सटेन्शन-ऑरेंज गेट टनल-नरीमन पॉईंट

6) सहावा रिंग रोड  नरीमन पॉईंटपासून वर्सोवा वांद्रे सागरी सेतू- मीरा भाईंदर लिंक रोड- अलिबाग विरार कॉरिडोर-ठाणे कोस्टल रोड-आनंद नगर साकेत फ्लायओव्हर-पूर्व द्रूतगती मार्ग-पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन-ऑरेंज गेट टनल-नरीमन पॉईंट

7) सातवा रिंग रोड नरीमन पॉईंटपासून वर्सोवा दहिसर भाईंदर लिंक रोड- उत्तण लिंक रोड-वडोदरा मुंबई एक्स्प्रेस हायवे, अलिबाग विरार मल्टीमॉडेल कॉरिडोर-अटल सेतू जेएनपीटी-ऑरेंज गेट टनल-नरीमन पॉईंट