मुंबई : आज विजयादशमीचा दिवस... रामाने रावणावर विजय मिळवला तो दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. आजचा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय यासाठी ओळखला जातो. निवडणुका तोंडावर असल्याने यावेळच्या विजयादशमीला वेगळे राजकीय परिमाणही आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार आजपासून खऱ्याअर्थी सुरु होत आहे. भाजपाचे राषट्रीय अध्यक्ष अमित शाह आज बीडमध्ये सावरगावच्या भगवान भक्ती गडावर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं अमित शाह भाजपाच्या प्रचाराचा शंख फुंकणार आहेत. आज संपूर्ण राज्याचे लक्ष हे पाटोदा तालुक्यातील संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगावच्या भगवान भक्तिगडावर असणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुडे यांचा मंगळवारी दुपारी १.०० वाजता दसरा मेळावा असणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
मोदी सरकारने काश्मीरमध्ये ३७० कलम हटवल्याचं कौतुक म्हणून यावेळी त्यांना खास ३७० तोफांची सलामी देण्यात येणार आहे. तसेच ३७० तिरंगी झेंडे फडकावून त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल. दरवर्षी पंकजा मुंडे यांचं भाषण हे दसरा मेळाव्यातील खास आकर्षण असतं. पण यंदा अमित शाह यांची उपस्थिती आणि त्यांना देण्यात येणारी ३७० तोफांची सलामी हा आकर्षणाचा विषय ठरणार आहे. यंदादेखील भगवानगडावर खूप भाविकांची गर्दी असणार आहे.
तसेच खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली यंदा गोपीनाथगड ते भगवानभक्ती गड अशी रॅली काढण्यात येणार आहे.