...तर लवकर महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करा; अमित शाहांचा महाविकास आघाडीला सल्ला

Amit Shah On Maharashtra Seat Sharing: महायुतीमधील जागावाटपावरुन चर्चा सुरु असतानाच अमित शाहांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडीमधील पक्षांना एक खोचक सल्ला दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 16, 2024, 11:00 AM IST
...तर लवकर महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करा; अमित शाहांचा महाविकास आघाडीला सल्ला title=
अमित शाहांनी एका मुलाखतीत केलं विधान

Amit Shah On Maharashtra Seat Sharing: देशातील लोकसभा निवडणुकींच्या तारखांची आज म्हणजेच शनिवारी (16 मार्च 2023) घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी 3 वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील 20 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपा वगळता महाराष्ट्रातील एकाही पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. महायुतीमधील एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपाबरोबर जागांसंदर्भातील वाटाघाटी करत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहांबरोबर जागावाटपावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत हे दोन्ही नेते दोनवेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील जागावाटपही पूर्ण झाल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असून 17 मार्च रोजी उमेदवारांची यादी जाहीर होईल असं सांगण्यात आलं आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अमित शाहांनी महाविकास आघाडीला एक खोचक सल्ला दिला आहे.

जागावाटपासंदर्भात अमित शाहांचा खुलासा

अमित शाहांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना महाराष्ट्रातील राजकीय स्थितीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्राती स्थानिक जाणकारांच्या अंदाजानुसार शरद पवार तसेच उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो. सध्याची तेथील युती किती चांगली कामगिरी करेल याबद्दल तुम्हाला किती विश्वास आहे? असा प्रश्न शाहांना विचारला गेला. अमित शाहांनी या प्रश्नाला उत्तर देताना तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याचं सांगितलं. "एनडीएच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये अगदी नावासहीत जागावाटप निश्चित झालं आहे. कोणताही वाद होणार नाही," असं अमित शाह म्हणाले.

नक्की वाचा >> '..म्हणून शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पडली'; ठाकरे-पवारांचा उल्लेख करत शाहांनी स्पष्टच सांगितलं

महाविकास आघाडीला खोचक सल्ला

अमित शाह इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीला टोलाही लागवाला. "(महायुतीमध्ये जागावाटपावरुन) वाद होईल असं मानून 'इंडिया' आघाडी आपले उमेदवार जाहीर करत नसेल तर त्यांनी ते लवकरच घोषित करावे कारण त्यांना इथून तसं काही मिळणार नाही," असं अमित शाह म्हणाले. अमित शाहांनी 'इंडिया टु डे कॉनक्लेव्ह'च्या कार्यक्रमामध्ये हे विधान केलं.

नक्की वाचा >> 6 हजार कोटींच्या इलेक्टोरल बॉण्डबद्दल विचारताच शाह संतापून राहुल गांधींचा उल्लेख करत म्हणाले, '12 लाख कोटींचे..'

उरलेल्या 28 जागा कोणाच्या?

48 जगांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून सध्या त्यांचे जितके खासदार आहेत तितक्या म्हणजेच 13 जागांची मागणी केली जात आहे. तसेच अजित पवार गटाकडूनही 7 ते 8 जागांसाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र अजित पवार गटाला 3 ते 4 जागा सोडल्या जातील असा अंदाजही व्यक्त केला आहे. 48 पैकी 20 उमेदवार आधीच जाहीर झाल्याने उर्वरित 28 झागांवर उमेदवार कोणत्या पक्षाचे असणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटपक्षांचं बैठकीचं सत्र सुरु आहे. वंचित बहुनज आघाडीचाही महाविकास आघाडीत समावेश आहे. त्यांच्याबरोबरही जागावाटपाची चर्चा सुरु असून 17 तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल असं सांगितलं जात आहे.